Join us

कर्जाचे हप्ते महागणार; स्टेट बँक, आयसीआयसीआय, पीएनबीकडून कर्जाच्या व्याजदरांमध्ये वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2018 6:42 PM

बँकांकडून देण्यात येणारी गृहकर्जे आणि इतर कर्जे महागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निर्णयाचा फटका कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या सामान्य ग्राहकांना बसू शकतो. 

 मुंबई: सार्वजनिक क्षेत्रातील तीन प्रमुख बँकांकडून गुरुवारी कर्जाच्या व्याजदरांमध्ये वाढ करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये नीरव मोदीने केलेल्या 11500 कोटींच्या महाघोटाळ्यामुळे चर्चेत असलेल्या पंजाब नॅशनल बँकेचाही समावेश आहे. याशिवाय, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि आयसीआयसीआय बँकेनेही व्याजदर वाढीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे भविष्यात गृहकर्ज घेणाऱ्या ग्राहकांना फटका बसण्याची शक्यता आहे. बँकिंग व्यवस्थेतील चलनाची तरलता कमी झाल्यामुळे स्टेट बँकेकडून काही दिवसांपूर्वी मुदत ठेवींवरील व्याजदरात 50 बेसिस पॉईंटसने वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आज स्टेट बँकेकडून इतर लेंडिंग रेटमध्ये 20 बेसिस अंकांनी वाढ करण्यात आली. त्यामुळे आता लेंडिंग रेट 8.15 टक्के इतका झाला आहे. स्टेट बँकेच्या पावलावर पाऊल ठेवत 1 मार्चपासून आयसीआयसीआय आणि पीएनबी बँकेनेही लेडिंग रेट 15 बेसिस अंकांनी वाढवण्याचा निर्णय घेतला. लवकरच एचडीएफसी बँकेकडूनही लेडिंग रेटमध्ये वाढ केली जाण्याची शक्यता आहे. यामुळे बँकांकडून देण्यात येणारी गृहकर्जे आणि इतर कर्जे महागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निर्णयाचा फटका कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या सामान्य ग्राहकांना बसू शकतो. 

टॅग्स :पंजाब नॅशनल बँकस्टेट बँक आॅफ इंडिया