Join us

चिंताजनक! नवीन एनपीए खात्यांत भर; बँकांनी वसुलीपेक्षा जास्त केली निर्लेखित खाती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 7:32 AM

२,०२,७८२ कोटींची थकीत खाती निर्लेखित 

हरिश गुप्ता

नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील बँका  किंवा  मोठ्या संख्येने खासगी क्षेत्रातील बँका असोत, दोन्ही बँका बुडत आहेत. धक्कादायक बाब अशी की, या बँकांनी २०२०-२१ मध्ये  केलेल्या वसुलीपेक्षा अधिक थकीत खाती निर्लेखित केली आहेत. सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँकेच्यादृष्टीने चिंताजनक बाब म्हणजे  २०२०-२१ दरम्यान एकूण निर्लेखित खात्यांपैकी नवीन थकीत (एनपीए) खात्यांत झालेली वाढ जास्त होती.

भारतीय रिझर्व्ह बँकेची आकडेवारी आणि संसदेत देण्यात आलेल्या माहितीनुसार, सार्वजनिक क्षेत्रातील १२ बँकांनी २०२०-२१ मध्ये  ८३२७७ कोटी रुपयांची वसुली केली, तर याच अवधीत ६० मोठ्या आणि छोट्या खासगी बँकांनी ३१०८४ कोटी रुपयांची वसुली केली. सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील या ७२ बँकांनी १,१४,३६१ कोटी रुपयांची केलेली वसुली यशोगाथा असली, तरी या दोन्ही क्षेत्रातील ७२ बँकांनी  २०२०-२१ मध्ये २,०२,७८२ कोटी रुपयांची  थकीत खाती निर्लेखित केली. म्हणजेच  वसुलीपेक्षा दुपटीने  थकीत खाती निर्लेखित केली.

आकडे काय सांगतात?

या अवधीत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी १,३१,८९४ कोटी रुपयांची थकीत खाती निर्लेखित केली, तर खासगी क्षेत्रातील  ६० बँकांनी ७०८८८ कोटी रुपयांची थकीत खाती निर्लेखित केली. त्यानुसार २०२०-२१ मध्ये   २,५५,७५९ कोटी रुपयांच्या नवीन थकीत खात्यांची भर पडली. सार्वजनिक बँकांपैकी बँक ऑफ महाराष्ट्रने २०२०-२१ मध्ये २३०२ कोटी रुपयांची वसुली केली, तर २२०२ कोटी रुपयांची नवीन थकीत खाती वाढली. एकूणच  नवीन थकीत खाती तयार होणे टाळण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील ११ बँकांची कामगिरी निराशाजनक राहिली. सर्वाधिक थकीत खाती  स्टेट बँक ऑफ इंडियाची होती. त्याखालोखाल पंजाब नॅशनल बँक होती. २०२०-२१ अखेर  एकूण  ८.३५ लाख कोटी रुपयांची थकीत खातेी (एनपीए) होती.

टॅग्स :बँक