नवी दिल्ली - सेबी प्रमुख माधबी बुच यांच्या विरोधात आता सेबीच्या अधिकाऱ्यांनी मानसिक छळाची तक्रार केली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, बुच यांच्या कार्यपद्धतीमुळे सेबीमधील कार्यसंस्कृती योग्य राहिलेली नाही. त्या आमच्या हालचालींवर मिनिटामिनिटाला नजर ठेवतात. अशक्य टार्गेट देऊन छळ करतात. बैठकांमध्ये अपशब्द वापरून सर्वांसमोर अपमानित करतात.
सेबीमध्ये ग्रेड ए आणि त्यापेक्षा वरिष्ठ पातळीवर काम करणारे सुमारे १ हजार अधिकारी आहेत. त्यातील जवळपास अर्ध्या अधिकाऱ्यांनी माधबी बुच यांच्या विरोधात केंद्रीय वित्त मंत्रालयाकडे एका पत्राद्वारे तक्रार केली आहे. अधिकाऱ्यांच्या मानसिक संतुलनावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. कार्य व जीवन यातील संतुलन बिघडले आहे, असे त्यात म्हटले आहे.
खासगी बँकेकडून वेतन घेतल्याचाही आरोपमाधबी पुरी आधीच हितसंघर्षाच्या आरोपाच्या घेऱ्यात सापडल्या आहेत. अमेरिकी शॉर्ट सेलर कंपनी हिंडेनबर्ग रिसर्चने अदाणी समूहावर केलेल्या आरोपांशी संबंधित हे प्रकरण आहे. सेबी अध्यक्षपदी असताना पुरी यांनी आयसीआयसीआय बँकेकडूनही वेतन स्वीकारल्याचा आरोप झाला आहे.