तुम्ही एखाद्या कंपनीत काम करत असाल तर त्या बदल्यात कंपनी तुम्हाला पगार देते. पण एक कंपनी अशी आहे जी कोणतेही काम न करता आपल्या एका कर्मचाऱ्याला १०५१५५९३.१८ रुपये पगार देत आहे. दुपारच्या जेवणाच्या वेळेशिवाय नोकरी करणाऱ्यांना ड्युटीच्या वेळेत खासगी कंपन्यांमध्ये क्वचितच विश्रांती मिळते. पण आयर्लंडचा एक कर्मचारी आहे ज्याला कंपनीत काम न करता कोट्यवधी रुपयांचा पगार मिळत आहे. कर्मचारी ड्युटीच्या वेळेत कार्यालयात कोणतेही काम करत नाही, तरीही कंपनी त्याला कोट्यवधींचा पगार देत आहे.
आयरिश रेल्वे कर्मचारी (Irish Rail worker) सध्या जगभरात चर्चेचा विषय बनला आहे. आयर्लंडचा रहिवासी डर्मोट अॅलिस्टर मिल्स खूप नाराज आहे कारण कंपनी त्याला दरवर्षी १,०५,००० पौंड (१०५१५५९३.१८ रुपये) फक्त वर्तमानपत्र वाचण्यासाठी, सँडविच खाण्यासाठी आणि फिरण्यासाठी देते. हा कर्मचारी आता इतका वैतागला आहे की त्यानं आपल्या कंपनी मालकाच्या विरोधात कोर्टात धाव घेतली आहे. डर्मोट सध्या आयरिश रेल्वेमध्ये आर्थिक व्यवस्थापक म्हणून काम करत आहे.
कर्मचाऱ्यानं न्यायालयाला सांगितलं की, मला काहीही न केल्याबद्दल १,०५,००० पौंड पगार मिळतो. २०१४ मध्ये कंपनीच्या आर्थिक घडामोडींची तक्रार उच्च अधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. त्यानंतर डर्मोट याच्याकडून काम काढून घेण्यात आलं होतं. मात्र, त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं नाही. आता कामावर आल्यावर त्याला काहीच काम करू दिलं जात नाही. तो फक्त वर्तमानपत्र वाचतो, जेवतो आणि काही वेळ फिरतो.
कोर्टासमोर मांडली कहाणी
"वर्क फ्रॉम होम नसेल तर मी सकाळी १० वाजता ऑफिससाठी निघतो. मग रस्त्यात दोन वत्रमानपत्र विकत घेतो. ऑफिसमध्ये पोहोचल्यानंतर एक सँडविच घेतो. त्यानंतर मी माझ्या क्युबिकलमध्ये जातो आणि माझा कॉम्युटर चालू करतो. मग मी आरामात वर्तमानपत्र वाचत बसतो. नंतर सँडविच खातो", असं डर्मोट मिल्सनं कोर्टाला सांगितलं.
फेब्रुवारीत पुढील सुनावणी
"सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास कोणताही ईमेल आला तर मी त्याला उत्तर देतो. त्याच्याशी संबंधित काही काम असेल तर ते काम मी करतो. मला क्वचितच कोणतेही मेल येतात, कारण आता त्याला कामाशी संबंधित कोणतीही माहिती किंवा मेसेज दिला जात नाही", असं मिल्सनं कोर्टाला सांगितलं. कंपनीच्या अंतर्गत व्यवहारांशी संबंधित कोणतेही मेल प्राप्त होत नाहीत, असंही त्यानं सांगितलं. या प्रकरणाची पुढील सुनावणी फेब्रुवारीपूर्वी अपेक्षित आहे.