कामगार मंत्रालयाने दिलेल्या प्रस्तावानुसार देशात कामाचे १२ तास होण्याची शक्यता आहे. परंतू ज्या देशात सध्या १२ तास काम सुरु आहे तेथील कामगारांची अवस्था पाहिली तर भयावह आहे. कोरोना संकटाचा सर्वाधिक फटका अर्थव्यवस्थेला बसला. कोरोनाच्या धक्क्यातून देशाची अर्थव्यवस्था अद्यापही सावरलेली नाही. असे असताना ज्या देशाने कोरोनाल जन्म दिला त्या देशातच कर्मचारी कामाच्या तणावातून आत्मदहन करत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
चीनमधीलकर्मचारी कामाचा ताण, कमी पगार आणि भेदभाव केला जात असल्याने त्रस्त झाले असून त्यांची सर्वात मोठी ई कॉमर्स कंपनी अलीबाबाचे कर्मचारी आत्महत्या करू लागले आहेत. कोरोना महामारीने त्यांच्यावरील ताण वाढविला असून टेक कंपन्यादेखील याचा शिकार होऊ लागल्या आहेत.
होम डिलिव्हरी करणाऱ्या ई-क़ॉमर्स कंपन्यांचे कर्मचारी कडाक्याच्या थंडीतदेखील खायच्या-प्यायच्या वस्तू घरोघरी पोहोचवत आहेत. त्यांच्याकडून १२-१२ तास काम करवून घेतले जात आहे. अशाच एका कामाच्या ताणामुळे त्रासलेल्या अलीबाबाच्या एका कर्मचाऱ्याने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त आहे. सध्या त्याला गंभीर अवस्थेत हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले असून तो मृत्यूशी झुंज देत आहे. आणखी एका कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. ते देखील १२-१२ तास काम करणारे होते.
अलीबाबा ग्रुपची ई-कॉमर्स कंपनीच्या चालकाने पगार दिला नाही म्हणून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. चिनी सोशल मिडीयावर याचा व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे. घटनास्थळी असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी लुई जिन नावाच्या या चालकाला तातडीने हॉस्पिटलमध्ये भरती केले. या घटनांमुळे चीनच्या १२ तास काम करवून घेणाऱ्या कंपन्यांविरोधात संताप वाढू लागला आहे. या कंपन्या कर्मचाऱ्यांकडून जादाचे कामही करून घेत आहेत आणि त्यांना नीट पगारही देत नाहीत.
भारताच्या संसदेत प्रस्ताव
कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास ८ तासांवरून १२ तास करण्याचा सरकारचा विचार आहे. कामगार मंत्रालयानं नुकताच संसदेला याबद्दलचा प्रस्ताव दिला आहे. कामगार मंत्रालय सुरक्षा, आरोग्य आणि कामाची परिस्थिती नियम २०२० मध्ये बदल करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठीचा प्रस्ताव श्रम मंत्रालयानं तयार केला आहे. १२ तासांच्या कामात मधल्या ब्रेकचादेखील समावेश असेल. या प्रस्तावात आठवड्याच्या कामाचे तास ४८ असतील, असं नमूद करण्यात आलं आहे. सध्याच्या नियमानुसार आठवड्याचे तास अठ्ठेचाळीसच आहेत. कामाच्या तासात वाढ केल्यानं ओव्हरटाईमचा भत्ता मिळेल. त्यामुळे अधिकचा भत्ता मिळून त्यांची कमाई वाढेल, अशी माहिती कामगार मंत्रालयातल्या एका अधिकाऱ्यानं दिली.