नोकरदार व्यक्तींसाठी खूशखबर आहे. जर तुम्ही नोकरी करत असाल आणि अप्रायझलची वाट पाहत आहात तर तुम्हाला मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. यावेळी भारतामध्ये कंपन्या कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये सरासरी ९.८ म्हणजेच सुमारे १० टक्क्यांनी वाढ करण्याची शक्यता आहे. ही पगारवाढ २०२२ च्या तुलनेत थोडी अधिक आहे. सन २०२२ मध्ये हा आकडा ९.४ टक्के होता.
कोर्न फेरीच्या नवीन सर्वेनुसार जे कर्मचारी अधिक चांगली कामगिरी करत आहेत. त्या लोकांसाठी वेतनवाढ अधिक होईल. कंपन्या विविध प्रतिभा व्यवस्थापनाबाबतची पावले आणि नुकसानभरपाई योजनांच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण आणि प्रमुख प्रतिभांना कायम ठेवण्यावर लक्ष देत आहे.
या सर्वेक्षणामध्ये सुमारे ८००,००० हून अधिक कर्मचारी असलेल्या ८१८ संस्थांचा समावेश करण्यात आला होता. या सर्वेनुसार २०२३ मध्ये भारतात वेतनामध्ये ९.८ टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. कोरोनाच्या मोठ्या प्रमाणात फैलाव झालेल्या २०२० मध्ये वेतनामधील ही वाढ ६.८ टक्क्यांहून खूप कमी होती. मात्र सध्याच्या वाढीचा कल मजबूत आणि उत्तम स्थिती दर्शवतो.
भारताच्या वाढत्या डिजिटल क्षमतेच्या निर्मितीवर लक्ष देण्याच्या अनुरूप, सर्वेक्षणामध्ये लाइफ सायन्स आणि आरोग्य आणि हाय टेक्नॉलॉजी क्षेत्रामध्ये क्रमश: १०.२ टक्के आणि १०.४ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच सेवा क्षेत्र ९.८ टक्के, वाहनासाठी ९ टक्के, केमिकल क्षेत्रात ९.६ टक्के, ग्राहक सामान क्षेत्रात ९.८ टक्के आणि बाजारामध्ये ९ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.