नवी दिल्ली :
देशातील संघटित क्षेत्रात नाेकऱ्या वाढल्याचे चित्र आहे. कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (ईपीएफओ) दिलेल्या माहितीनुसार, नाेव्हेंबर २०२२ मध्ये एकूण १६.२६ लाख नवे सदस्य जाेडल्या गेले आहेत. त्यात ऑक्टाेबरच्या तुलनेत २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे प्रथमच जाेडल्या गेलेल्या सदस्यांमध्ये वाढ झाली आहे.
केंद्रीय कामगार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, नाेव्हेंबरमध्ये जाेडल्या गेलेल्या सदस्यांपैकी ८.९९ लाख सदस्य प्रथमच ईपीएफओमध्ये जुळले आहेत. त्यातुलनेत ऑक्टाेबरमध्ये हा आकडा ७.२८ लाख एवढा हाेता. त्यात १.७१ लाख सदस्यांची वाढ नोंदविण्यात आल्याची माहिती ईपीएफओने दिली आहे.
तरुण सदस्य सर्वाधिक
नाेव्हेंबरमधील नव्या सदस्यांमध्ये सर्वाधिक २.७७ लाख सदस्य हे १८ ते २१ वयाेगटातील, तर २.३२ लाख सदस्य २२ ते २५ वयाेगटातील आहेत. त्यामुळे तरुणांना नाेकऱ्या मिळत असल्याचे आकडेवारीतून दिसत आहे.