संजय शर्मालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली/ मुंबई : एअर इंडिया एक्स्प्रेस कंपनीच्या ३०० हून अधिक वैमानिक आणि केबिन क्रू कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सायंकाळी अचानक आजारपणाचे कारण देत सामूहिक रजा घेतल्याचा फटका कंपनीच्या देशाअंतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय विमानसेवेला बसला. त्यामुळे बुधवारी दिवसभरात कंपनीची तब्बल ९० विमाने रद्द झाली. परिणामी एअर इंडियाच्या प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) या घटनेची गंभीर दखल घेतली असून कंपनीकडून अहवाल मागविला आहे.
टाटा समूहातर्फे चालविल्या जाणाऱ्या या कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या सेवा-शर्तीमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यास विरोध म्हणून कर्मचाऱ्यांनी आजारपणाचे कारण देत रजा घेतली. मंगळवारी रात्री अचानक कर्मचारी आजारी पडल्याचे कळाल्याने काही उड्डाणे रद्द करावी लागली, तर काहींना उशीर झाला. गैरसोय झालेल्या प्रवाशांना त्यांच्या तिकिटाचे पैसे परत केले जातील, असे कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले.
कर्मचाऱ्यांनी का पुकारला संप? टाटा समूहाने एअर इंडियाचा कारभार हाती घेतल्यानंतर केलेले बदल कर्मचारीविरोधी असल्याची भावना त्यांच्यात आहे. एअर एशिया व एअर इंडियाच्या प्रस्तावित विलीनीकरणानंतर एअर एशियाच्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्यात येत आहे, तर एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मात्र अशा पद्धतीची सेवा उपलब्ध नसल्याचा दावा कर्मचारी करत आहेत. कर्मचाऱ्यांच्या वेतनातून घरभाडे भत्ता, महागाई भत्ता, प्रवास भत्ता हटविण्यात आल्याचा दावादेखील केला जात आहेत. तसेच आम्हाला दुय्यम काम दिले जात असल्याचेही कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
मंत्रालयाने कंपनीकडे मागितला अहवालनागरी उड्डयन मंत्रालयाने या घटनेचा संपूर्ण अहवाल कंपनीकडे मागितला आहे. नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयानेही (डीजीसीए) कंपनीला मार्गदर्शक सूचनांनुसार सेवा देण्याचे निर्देश दिले आहेत. यावर तोडगा काढण्याचा प्रयत्नही डीजीसीएकडून केला जात आहे.