Join us

कर्मचार्‍यांची खांदेपालट राहिली कागदावरच

By admin | Published: September 25, 2014 11:03 PM

प्रशासनाकडून काणाडोळा : काहींची नाराजी

प्रशासनाकडून काणाडोळा : काहींची नाराजीनाशिक : महिनाभरापूर्वी जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील सुमारे ४० कर्मचार्‍यांचे विभाग आणि टेबल बदलण्याची प्रशासनाने केलेली कार्यवाही कागदावरच राहिली असून, प्रत्यक्षात बदली झालेले कर्मचारी हे त्या-त्या विभागातच तळ ठोकून असल्याचे धक्कादायक वृत्त आहे.शासन निर्णयानुसार एकाच विभागात तीन वर्षे झालेल्या कर्मचार्‍यांचे टेबल बदलण्याचे व एकाच विभागात पाच वर्षे झालेल्या कर्मचार्‍यांचे विभाग बदलण्याचे आदेश असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील ४० कर्मचार्‍यांच्या बदल्यांचे आदेश काढले होते. त्यात काही कर्मचार्‍यांचे टेबल बदलण्यात आले होते, तर काही कर्मचार्‍यांचे विभाग बदलण्यात आले होते. आता कर्मचार्‍यांची खांदेपालट करून महिना- दोन महिन्यांचा कालावधी उलटला असला, तरी प्रत्यक्षात यातील काही कर्मचारी बदली होऊनही आधीच्याच जागी कार्यरत असल्याचे समजते. काही प्रामाणिक कर्मचारी मात्र तत्काळ बदलीच्या ठिकाणी रुजू झाले आहेत; मात्र काही कर्मचार्‍यांनी विभाग सोडण्यास नकार दिला आहे. लेखा, बांधकाम, शिक्षण, महिला व बालकल्याण विभाग व सामान्य प्रशासन यांसह अन्य काही विभागांतील कर्मचारी अद्यापही ठाण मांडून असून, प्रशासनाने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी केलेली कर्मचार्‍यांची खांदेपालट शोभेपुरतीच उरल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)