- सोपान पांढरीपांडे
नागपूर - बेरोजगारीचा दर ६.१० टक्के ४५ वर्षांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचला असल्याने विशेष बाब म्हणून सरकारने एम्प्लॉयमेंट बाँड्सद्वारे(रोजगार रोखे) बाजारातून कर्ज उभे करावे आणि ते रोजगार निर्मिती करण्यासाठी वापरावे, अशी सूचना प्रख्यात अर्थतज्ज्ञ डॉ, एस. व्ही. खांदेवाले यांनी केली.
डॉ. खांदेवाले यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, पंतप्रधान आवास योजना, मनरेगा, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे रोजगार निर्मिती सुरू आहे. पण आर्थिक मंदीमुळे हे प्रयत्न अपुरे पडत आहेत. गरज आहे ग्रामीण भागांत रोजगार निर्मितीची. त्यासाठी सरकारने प्रथम गावांची पुनर्रचना करावी, म्हणजे गावातले रस्ते, शाळांची मैदाने, इमारतींचे नूतनीकरण करावे वा नवीन बांधावे. यामुळे वीटभट्ट्या, सिमेंट, पोलाद यांची मागणी वाढून औद्योगिक मंदी दूर होईल. शिवाय मोठ्या प्रमाणात रोजगार तयार होतील. शिवाय काढलेले कर्जही उत्पादक कामासाठी सत्कारणी लागेल.
रोजगार निर्मितीचा दुसरा प्रयत्न म्हणजे आयटीआयमधून तंत्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांना औद्योगिक क्षेत्रात सामावून घेण्यासाठी सरकारने सर्व उद्योगांशी बोलणी सुरू करावीत, असे सांगून डॉ. खांदेवाले म्हणाले की, बी.ए., बी.कॉम.सारख्या पदव्या घेतलेले मोठ्या प्रमाणात बेकार आहेत. त्यांचा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यालयीन कामासाठी उपयोग होऊ शकतो. असा प्रयत्न आजवर झालेला नाही, सरकारने हे काम त्वरित हाती घ्यावे.
शेतकऱ्यांसाठीच्या योजनांत सरकारने आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे. या योजना शेतकऱ्यांच्या सूचनेनुसार करायला हव्यात. मागे पश्चिम बंगाल सरकारने २०.२५ शेतक-यांना मिळून एक ट्यूबवेल, अशी योजना आखली होती. असाच प्रयत्न समूह शेतीसाठी करता येणे शक्य आहे, असे नमूद करून डॉ. खांदेवाले म्हणाले की, आर्थिक व औद्योगिक मंदी व बेरोजगारीमुळे यंदाचा अर्थसंकल्प महत्त्वाचा आहे. त्यामुळे एम्प्लॉयमेंट बाँड्सची घोषणा अर्थसंकल्पातच करावी.
Budget 2020: एम्प्लॉयमेंट बाँड्सद्वारे कर्ज उभारून रोजगार निर्मिती करावी!
रोजगार निर्मितीचा दुसरा प्रयत्न म्हणजे आयटीआयमधून तंत्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांना औद्योगिक क्षेत्रात सामावून घेण्यासाठी सरकारने सर्व उद्योगांशी बोलणी सुरू करावीत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 04:17 AM2020-01-22T04:17:57+5:302020-01-22T04:18:44+5:30