नवी दिल्लीः देशात गेल्या 6 वर्षांत रोजगारांमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. एका सर्वेक्षणानुसार गेल्या 6 वर्षांत 90 लाख रोजगार बुडाले आहेत. स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात रोजगारांमध्ये घसरण नोंदवली गेली आहे. अजीम प्रेमजी युनिव्हर्सिटीच्या सेंटर ऑफ सस्टेनेबल इम्प्लॉयमेंटकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालात नोकऱ्यांमध्ये झालेल्या घसरणीचा उल्लेख करण्यात आलेला आहे. वर्षं 2011-12 ते 2017-18 दरम्यान भारतात रोजगार घटले आहेत. हा अहवाल संतोष मेहरोत्रा आणि जेके परिदा यांनी तयार केला आहे. मेहरोत्रा आणि परिदा यांच्यानुसार वर्ष 2011-12 ते 2017-18 दरम्यान एकूण 90 लाख रोजगार बुडाले. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात रोजगार गेल्याचं समोर आलं आहे. संतोष मेहरोत्रा जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीत अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत. तर जेके परिदा सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ पंजाबमध्ये शिकवतात. विशेष म्हणजे हे आकडे गेल्या काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या अध्ययनाच्या एकदम विरुद्ध आहेत. 2011-2012 ते 2017-18दरम्यान 1.4 कोटी नोकऱ्या उत्पन्न झाल्याचा एक अहवाल आला होता. देशात नोकऱ्या वाढत असल्याचा हा अहवाल लवीश भंडारी आणि अमरेश दुबे यांनी तयार केला होता. या दोघांचा अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आर्थिक सल्लागार परिषदेत समाविष्ट करण्यात आला आहे. या विषयावर जवाहरलाल युनिव्हर्सिटीचे संशोधक हिमांशू यांनीसुद्धा एक रिपोर्ट सादर केला होता. त्या रिपोर्टनुसार 2011-2012 ते 2017-18दरम्यान 1.6 कोटी नोकऱ्यांमध्ये घसरण झाल्याचं सांगितलं जातंय. लवीश भंडारी आणि अमरेश दुबे यांनी स्वतःच्या अभ्यासात 2017-18मध्ये भारताची लोकसंख्या 1.36 अब्ज असल्याचं सांगितलं होतं. तर संतोष मेहरोत्रा आणि जेके परिदा यांनी भारताची लोकसंख्या 1.35 अब्ज निर्धारित केली होती. दुसरीकडे जागतिक बँकेनं 2017-18मध्ये भारताची लोकसंख्या 1.33 अब्ज असल्याचं सांगितलं आहे.
धक्कादायक! इतिहासात पहिल्यांदाच 'मोदी राज'मध्ये 90 लाख रोजगार बुडाले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2019 1:15 PM