Join us  

रोजगार वाढले; अर्ज केला का? देशातील बरोजगारीचा दर सहा वर्षांच्या नीचांकी पातळीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 12:49 PM

राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाने (एनएसएसओ) सोमवारी या सर्वेक्षणाचा अहवाल जारी केला. ‘कालबद्ध श्रमशक्ती सर्वेक्षण वार्षिक अहवाल २०२२-२३’ असे त्याचे नाव आहे. त्यात हा तपशील देण्यात आला आहे.

नवी दिल्ली : देशातील १५ वर्षांवरील व्यक्तींमधील बेरोजगारीचा दर जुलै २०२२ ते जून २०२३ या काळात घटून ३.२ टक्के झाला. हा बेरोजगारीचा ६ वर्षांचा नीचांक आहे. ताज्या श्रमशक्ती सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर देशातील एकूण रोजगारांच्या स्थितीबाबत ही सकारात्मक बाब समोर आली आहे. 

राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाने (एनएसएसओ) सोमवारी या सर्वेक्षणाचा अहवाल जारी केला. ‘कालबद्ध श्रमशक्ती सर्वेक्षण वार्षिक अहवाल २०२२-२३’ असे त्याचे नाव आहे. त्यात हा तपशील देण्यात आला आहे.

अहवालानुसार, देशातील १५ वर्षांवरील व्यक्तींमधील बेरोजगारांच्या संख्येमध्ये सातत्याने घट झालेली दिसून येत आहे. देशातील एकूण श्रमशक्ती डेटाच्या उपलब्धतेचे महत्त्व लक्षात घेऊन ‘एनएसएसओ’ने एप्रिल २०१७ मध्ये ‘कालबद्ध श्रमशक्ती सर्वेक्षणास’ सुरुवात केली होती. 

श्रम भागीदारीही वाढलीदेशात शहरी क्षेत्रातील श्रमशक्ती भागीदारी एप्रिल ते जून २०२३ या कालावधीमध्ये वाढून ४८.८ टक्के झाली. आदल्या वर्षी याच कालावधीत ती ४७.५ टक्के होती. 

महिलांच्या बेरोजगारीत लक्षणीय घट - सर्वेक्षणानुसार, शहरी भागांत १५ वर्षांवरील महिलांतील बेरोजगारीचा दर एप्रिल-जून २०२३ मध्ये घटून ९.१ टक्के झाला. - आदल्या वर्षी याच तिमाहीत तो ९.५ टक्के होता. पुरुषांची बेरोजगारी या कालावधीत घटून ५.९ टक्के झाली. आधी ती ७.१ टक्के होती. - जानेवारी-मार्च २०२३ मध्ये ती ६ टक्के, ऑक्टोबर-डिसेंबर २०२२ मध्ये ६.५ टक्के आणि जुलै-सप्टेंबर २०२२ मध्ये ६.६ टक्के होती.

‘सामान्य स्थिती’ म्हणजे काय?बरोजगारीचे मोजमाप ‘सामान्य स्थिती’च्या आधारे केले जाते. रोजगार हा सर्वेक्षण तारखेआधी ३६५ दिवसांच्या आधारे निर्धारित केला आहे. कालबद्ध श्रमशक्ती सर्वेक्षणानुसार बेरोजगारीचा दर २०२०-२१ मध्ये ४.२ टक्के, २०१९-२० मध्ये ४.८ टक्के, २०१८-१९ मध्ये ५.८ टक्के आणि २०१७-१८ मध्ये ६.०० टक्के होता.

शहरी भागात १ टक्का घट२०२१-२२ मध्ये ‘सामान्य स्थिती’ बेरोजगारीचा (यूआर) दर ४.१ टक्के होता. तो २०२२-२३ मध्ये घटून ३.२ टक्के झाला आहे. एप्रिल-जूनच्या तिमाहीत शहरी भागातील बेरोजगारी वार्षिक आधारावर १ टक्का घटून ६.६ टक्के झाली. आदल्या वर्षीच्या याच कालावधीत ती ७.६ टक्के होती.

लॉकडाऊन काळात वाढएप्रिल-जून २०२२ मध्ये कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे उद्योग धंदे बंद होते. त्यामुळे या काळातील बेराेजगारीचा दर अधिक होता. जानेवारी-मार्च २०२३ मध्ये बेरोजगारी ६.८ टक्के आणि जुलै-सप्टेंबर व ऑक्टोबर-डिसेंबर २०२२ मध्ये ७.२ टक्के होती.

टॅग्स :कर्मचारीनोकरी