Join us  

दूरसंचार, बँकिंग क्षेत्रात रोजगाराची संधी वाढली

By admin | Published: October 12, 2015 10:19 PM

दूरसंचार, बँकिंग आणि सॉफ्टवेअर क्षेत्रात तेजी आल्यामुळे सप्टेंबरमध्ये रोजगारांच्या संधीत १८ टक्के वाढ झाली. हा वाढीचा कल येत्या काही महिन्यांपर्यंत राहील.

नवी दिल्ली : दूरसंचार, बँकिंग आणि सॉफ्टवेअर क्षेत्रात तेजी आल्यामुळे सप्टेंबरमध्ये रोजगारांच्या संधीत १८ टक्के वाढ झाली. हा वाढीचा कल येत्या काही महिन्यांपर्यंत राहील. सप्टेंबर महिन्यासाठी नोकरी जॉब स्पीक इंडेक्स गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत १८ टक्क्यांनी वाढून १,७९६ झाला.नोकरी डॉट कॉमचे मुख्य विक्री अधिकारी व्ही. सुरेश म्हणाले की, ‘‘आॅगस्टमध्ये १३ टक्के चांगल्या वाढीनंतर नोकऱ्यांच्या बाजारात चांगली तेजी आहे व सप्टेंबरमध्ये त्यात १८ टक्क्यांची वाढ झाली. ही वाढ होण्यास दूरसंचार, बँकिंग, सॉफ्टवेअर आणि सेवा क्षेत्रांची भूमिका महत्त्वाची आहे.’’ जुलै ते सप्टेंबरदरम्यान दूरसंचार, प्रसारमाध्यमे, मनोरंजन, माहिती व तंत्रज्ञानाशी संबंधित सेवा आणि वाहन उद्योगांशी संबंधित सेवांमध्ये सतत वाढ झाली. हा वाढीचा कल असाच राहण्याची शक्यता असून इतर क्षेत्रांतही वाढीचा कल हळूहळू; परंतु सतत राहण्याची आम्हाला आशा असल्याचे सुरेश म्हणाले. महानगरांचा विचार केला, तर सगळ्यात जास्त वाढ (२९ टक्के) झाली ती दिल्ली-एनसीआरमध्ये. हैदराबाद व चेन्नई अनुक्रमे २५ व १८, कोलकात्यात २२, मुंबई, पुणे आणि बंगळुरूत अनुक्रमे १९, १४ व १३ टक्के वाढ झाली.