मुंबई : विविध देशांच्या अर्थव्यवस्थांना सक्षम करण्यासाठी जागतिक स्तरावर सीमामुक्त व्यापार असावा. त्यातूनच खऱ्या अर्थाने आर्थिक विकास साधला जाईल. यासाठी सर्वच देशांनी व्यापारातील अडथळे दूर होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे आवाहन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केले. जागतिक सीमाशुल्क संघटनेची (डब्ल्यूसीओ) धोरण बैठक सोमवारी येथे सुरू झाली. ३० देशांचे सीमाशुल्क अधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत. जेटली यांनी व्हिडीओद्वारे बैठकीला मार्गदर्शन केले.
ते म्हणाले, भयमुक्त व्यापारासाठी सर्वच देशांनी अडथळे दूर करणे आवश्यक आहे. भारताने असे विदेशी व्यापारासंबंधीचे अडथळे दूर करून विशेष सुविधांची उभारणी केली. त्याचे प्रतिबिंब ‘इज आॅफ डुइंग बिझनेस’मध्ये तत्काळ दिसले. व्यवसाय सुलभीकरणात भारताचे मानांकन सुधारले.
वस्तुंची तस्करी रोखण्यासाठी केंद्र सरकारने ‘राष्टÑीय व्यापार सुलभता कृती आराखडा’ तयार केला आहे. या आराखड्यांतर्गत भारत विविध देशांशी तस्करीविरोधी संयुक्त करार करणार आहे. या अंतर्गत या बैठकीत अमेरिका, कोरिया व जपान यांच्याशी भारत असा करार करणार आहे.
तसेच समुद्री चाचेगिरी रोखण्यासाठी छोट्या बेटांवरील देशांशीही डब्ल्यूसीओ चर्चा करीत आहे, अशी माहिती केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क मंडळाचे अध्यक्ष आणि डब्ल्यूसीओच्या आशिया क्षेत्राचे अध्यक्ष एस. रमेश यांनी पत्रपरिषदेत दिली.
>जीएसटी महसूल हा चिंतेचा विषय
नोव्हेंबर महिन्याचा जीएसटी महसूल ९७ हजार कोटी रुपयांवर आला आहे. महिन्यातील जीएसटी महसूल १ लाख कोटीपेक्षा कमी राहणे, हा चिंतेचा विषय आहे, पण केवळ एक-दोन महिन्यात असे झाल्याचा एकंदर महसुलावर फार परिणाम होणार नाही.
चालू आर्थिक वर्षात असे फक्त दोन वेळा झाले आहे. आता येत्या काळात जीएसटी वसुली वाढविण्यासाठी अर्थमंत्रालय तयारी करीत आहे, असे केंद्रीय महसूल सचिव अभय भूषण पांडे यांनी सांगितले.
>तस्करी रोखण्यासाठी ‘ड्रोन’चा वापर
तस्करी रोखण्यासाठी आता सीमाशुल्क विभागाने ‘ड्रोन’चा वापर सुरू केला आहे. ड्रोनद्वारे तस्करांवर नजर ठेवली जात आहे. यासाठी देशभरात दहा ठिकाणी ‘अॅडव्हान्स फॅसिलिटेशन इन्फॉर्मेशन सीस्टम’ ही अत्याधुनिक केंद्रे उभी केली आहेत, असे रमेश यांनी सांगितले.
अर्थव्यवस्थांना सक्षम करण्यासाठी सीमामुक्त व्यापाराची आहे गरज
विविध देशांच्या अर्थव्यवस्थांना सक्षम करण्यासाठी जागतिक स्तरावर सीमामुक्त व्यापार असावा. त्यातूनच खऱ्या अर्थाने आर्थिक विकास साधला जाईल.
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 05:33 AM2018-12-04T05:33:43+5:302018-12-04T05:33:57+5:30