Join us  

झटका सहन करण्यास भारतीय अर्थव्यवस्था सक्षम

By admin | Published: June 25, 2016 2:55 AM

भारताची आर्थिक पायाभूत संरचना अत्यंत मजबूत असल्याने ब्रेक्झिटचा झटका सहन करण्यास भारतीय अर्थव्यवस्था सक्षम असल्याची प्रतिक्रिया उद्योगजगताने दिली आहे.

नवी दिल्ली : भारताची आर्थिक पायाभूत संरचना अत्यंत मजबूत असल्याने ब्रेक्झिटचा झटका सहन करण्यास भारतीय अर्थव्यवस्था सक्षम असल्याची प्रतिक्रिया उद्योगजगताने दिली आहे.मात्र, ब्रिटनमध्ये गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांना आपली रणनीती नव्याने निश्चित करावी लागेल. कारण त्यांच्यावर नक्कीच नकारात्मक परिणाम होईल, असे उद्योगजगताचे म्हणणे आहे.भारतीय उद्योग महासंघाचे (सीआयआय)चे महासंचालक चंद्रजित बॅनर्जी म्हणाले की, भारतीय अर्थव्यवस्थेची पायाभूत रचना मजबूत आहे. ब्रेक्झिटमुळे काही काळ विपरीत परिस्थिती निर्माण होणार असली तरीही त्याचा मुकाबला करण्यास अर्थव्यवस्था सज्ज आहे. ‘असोचेम’ या उद्योग संघटनेचे प्रमुख डी.एस. रावत म्हणाले की, भारताचा ब्रिटिश अर्थव्यवस्थेत मोठी कॉर्पोरेट गुंतवणूक आहे. त्यामुळे ब्रिटनमध्ये उत्पादन आणि अन्य सुविधा ठेवणाऱ्या कंपन्यांना आपल्या व्यावसायिक योजनेत बदल घडवावे लागतील. सीआयआयचे अध्यक्ष नौशाद फोर्ब्स म्हणाले की, ब्रिटनच्या या निर्णयानंतर भारतीय कंपन्यांना नव्याने धोरण ठरवावे लागेल. एकूणच विचार करता भारतावर फारसा परिणाम होणार नाही.रेटिंग्स अ‍ॅण्ड रिसर्चचे प्रमुख अर्थतज्ज्ञ सुनीलकुमार सिन्हा म्हणाले की, ब्रेक्झिटमुळे युरोप आणि ब्रिटनमध्ये गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांवर विपरीत परिणाम होईल.पीएच.डी. चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष महेश गुप्ता म्हणाले की, चलन आणि वित्त बाजारात गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार होत असून, हा झटका स्वीकारण्यास भारतीय अर्थव्यवस्था सक्षम आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)