मुंबई : सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात अवघे दोन दिवसच बँका सुरु राहणार आहेत. यामुळे बँकांशी संबंधीत काही कामे असल्यास ती येत्या शनिवारपर्यंत उरकून घ्यावी, असे वृत्त आज सकाळपासूनच पसरले होते. मात्र, पडताळणीअंती ही अफवा असल्याचे उघड झाले.
सप्टेंबरच्या सुरुवातीला 2 तारखेला रविवार आहे. यानंतर 3 सप्टेंबरला जन्माष्टमीमुळे सार्वजनिक सुट्टी असणार आहे. त्यानंतर बँक कर्मचाऱ्यांनी पेन्शन आणि अन्य मुद्द्यांवर दोन दिवसांचा संप पुकारला आहे. म्हणजे 4 आणि 5 तारखेला संपामुळे बँकेचे कामकाज होणार नाही. यानंतर 6 आणि 7 तारखेला बँकांचे कामकाज चालेल. यानंतर पुन्हा दोन दिवसांची सुटी असणार असल्याचा संदेश आज सकाळपासून समाजमाध्यमांवर पसरला होता.
मात्र, केवळ रविवारीच सुटी असून जन्माष्टमीची सुटी नसल्याचे बँकेच्या सुत्रांनी सांगितले. तसेच संपाबाबत पदाधिकाऱ्यांना संघटनांकडून पत्र येते, तेही अद्याप आलेले नाही. यामुळे संप पुकारलेला नाही. यामुळे या दोन दिवशीही बँका सुरुच राहणार आहेत, असे स्पष्ट केले. यामुळे ही अफवा आहे. पुढील आठवड्यात बँका कामकाजाचे सर्व दिवस सुरुच राहणार आहेत. यामुळे ग्राहकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन बँकांच्या अधिकाऱ्यांनी केली आहे.