- चिन्मय काळे
मुंबई : यंदा मान्सून दमदार बॅटिंग करीत आहे. १ जून ते १७ जुलैदरम्यान राज्यात सरासरीपेक्षा तब्बल ४१ टक्के अधिक पाऊस पडला आहे. देशातील मान्सून सरासरीच्या दोनच टक्के कमी आहे. एकूणच चांगल्या पावसामुळे आर्थिक क्षेत्रात उत्साहाचे वातावरण आहे. कृषी क्षेत्राच्या जीडीपीसह रोजगारवाढीचेही संकेत आहेत.
यंदा मान्सून समाधानकारक असेल, असा अंदाज हवामान खात्याने एप्रिल महिन्यात वर्तवला होता. त्यानुसार वेळेत धडक दिल्यापासून राज्यभर जोरदार पाऊस सुरू आहे. १ जून ते १७ जुलै या काळात राज्यात सरासरी ३८७.२ मिमी पाऊस पडतो. यंदा तो ५४७.६ मिमी बरसला आहे. यामुळे पावसावर अवलंबून असलेल्या अर्थव्यवस्थेतील ६० टक्के क्षेत्रांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
कृषी क्षेत्राचा जीडीपी ४ टक्के!
पावसाचा नकारात्मक अथवा सकारात्मक असा दोन्ही स्वरूपाचा सर्वाधिक परिणाम कृषी क्षेत्रावर होत असतो. यंदा जोरदार पाऊस होत असल्याने कृषी क्षेत्राचा विकास दर दुप्पट होण्याचा अंदाज आहे. २०१५ व २०१७ ही दोन वर्षे राज्यात दुष्काळी स्थिती असल्याने कृषी क्षेत्राचा विकास दर (जीडीपी) दीड ते दोन टक्क्यांपर्यंत घसरला होता. तो यंदा ४ टक्क्यांच्या जवळ असेल, असे स्टेट बँकेच्या आर्थिक संशोधन विभागाचे म्हणणे आहे.
६ टक्के रोजगारवाढ अपेक्षित
दुष्काळी स्थितीमुळे कृषी व संलग्न क्षेत्रात दोन वर्षांपासून मंदी होती. विशेषत: कृषी सामग्री उत्पादन क्षेत्र संकटात होते. ट्रॅक्टर कंपन्यांमध्ये दोनच शिफ्टमध्ये उत्पादन सुरू होते. त्यातून रोजगारावर परिणाम झाला होता. पण यंदा चांगल्या मान्सूनमुळे ट्रॅक्सरसह अन्य सामग्रींच्या मागणीत वाढ होण्याची चिन्हे आहेत. त्यातून कृषी व संलग्न क्षेत्रातील प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष रोजगारात ६ टक्क्यांपर्यंत वाढीची शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
>शेतकऱ्यांची
क्रयशक्ती वाढेल
‘चांगला पाऊस पडला की शेती उत्पादन वाढते. त्यात यंदा कृषीमालाला दीडपट हमीभाव मिळणार आहे. यातून शेतकºयांची क्रयशक्ती वाढेल. क्रयशक्ती वाढली की त्याचा परिणाम पूर्ण बाजारपेठेवर होऊन खरेदी-विक्री वाढते. याचे निकाल दिवाळीदरम्यान दिसू लागतील.
- दीपेन अग्रवाल
अध्यक्ष, केमिट राज्य संघटना
>१७ जुलैपर्यंतचे पर्जन्यमान असे
देश ३१०.५ -२
कोकण २००६ ५३
प. महाराष्टÑ ३५७.८ ३०
मराठवाडा २८५.७ २२
विदर्भ ४८५.७ ४४
राज्य ५४७.६ ४१