- सी. ए. उमेश शर्माअर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, दिवाळीनिमित्त सर्व जण फटाके खरेदी करतात. या वेळी फटाक्यांवर खूप चर्चा होत आहे. कोर्टातही कायदा आणि फटाका यांचा संदर्भ जोडला जात आहे, तर जीएसटी कायदा आणि फटाके यांचा एकमेकांशी संबंध कसा जोडला जाईल?कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, दिवाळीचा सण हा अतिशय आनंदाचा सण आहे. यात धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन इत्यादींना खूप महत्त्व आहे, तसेच या सणास फटाके (कायदे) फोडून जल्लोष केला जातो. दरवर्षी सरकार काहीतरी नवीन प्रकारचे फटाके फोडते. या वर्षी तर जीएसटीचा अतिशय मोठा आणि नवीन अॅटम बॉम्ब सरकारने दिवाळीच्या अगोदरच करदात्यांवर फोडला आहे.अर्जुन : कृष्णा, जीएसटी फटाका स्टॉलमध्ये एखादा तीन आवाजी फटाका आहे का?कृष्ण : होय अर्जुना, या स्टॉलमध्ये तीन आवाजी फटाका आहे. या फटाक्यांचा पुरवठा झाल्यावर सीजीएसटी, एसजीएसटी, आयजीएसटी असे तीन आवाज निघतील. म्हणजेच करदात्याला वस्तू किंवा सेवांचा पुरवठा झाल्यावर, हे तीन कर भरावे लागतील.अर्जुन : कृष्णा, सरकारच्या जीएसटी फटाका स्टॉलमध्ये विविध प्रकारचे फटाके असतील, परंतु त्यातील ’रॉकेट’ कोणते आहे?कृष्ण : अर्जुना, ‘रॉकेट’ म्हणजे आरसीएम. जसे रॉकेट लावणारा अनोंदणीकृत करदाता आणि रॉकेट जिथे जाऊन फुटते, ती व्यक्ती म्हणजे नोंदणीकृत करदाता, अशी आरसीएमची गत आहे. सरकारने अधिसूचनेद्वारे आरसीएमच्या तरतुदी १३ आॅक्टोबरपासून ३१ मार्च २०१८ पर्यंत पुढे ढकलल्या आहेत.अर्जुन : जीएसटीच्या स्टॉलमध्ये ‘फटाक्यांची लड’ पण असेलच.कृष्ण : हो अर्जुना, ‘फटाक्यांची लड’ पण आहे. फटाक्यांच्या लडीमध्ये एक फटाका दुसºया फटाक्याला जोडलेला असतो आणि एक फटाका फुटला की दुसरा फुटतो. त्याचप्रमाणे, जीएसटीमध्ये मॅचिंग-मिसमॅचिंगची संकल्पना आहे. आपली खरेदी आणि समोरच्याची विक्री हे एकमेकांना जोडलेले असतात. विक्री करणाºया व्यक्तीने त्याच्या जीएसटीआर-१ मध्ये दाखल केलेला तपशील आपल्या जीएसटीआर-२ए मध्ये परावर्तित होतो. जर तो तपशील जुळला नाही, तर जीएसटीआर-२ मध्ये ‘लड’ पेटवावी लागेल.अर्जुन : यात ‘भुईचक्कर’ कोणते आहे?कृष्ण : अर्जुना, ‘भुईचक्कर’ म्हणजे रिटर्न्स होय. भुईचक्कर जसे एकाच जागी गोल गोल फिरते, त्याच प्रमाणे रिटर्न्सची गत आहे. प्रत्येक करदात्याला दर महिन्याला प्रत्येकी तीन असे वर्षभरात ३६ रिटर्न्स दाखल करावे लागतील. म्हणजे करदात्याला रिटर्न्सच्या ‘चक्कर’मध्ये ‘भुई’वर यावे लागेल.अर्जुन : कृष्णा, जीएसटीमधील ‘सुतळी बॉम्ब’ कोणता?कृष्ण : अर्जुना, ‘सुतळी बॉम्ब’ म्हणजे पॅनल्टी किंवा लेट फीस. सरकारने प्रत्येक रिटर्नसाठी देय तारीख दिलेली आहे. प्रत्येक करदात्याने कायद्याच्या तरतुदींचे पालन करून वेळेवर रिटर्न्स दाखल करावे, नाहीतर करदात्यावर सरकारचा ‘सुतळी बॉम्ब’ फुटेल.अर्जुन : कृष्णा, या स्टॉलमध्ये लवंगी फटाके आहेत का?कृष्ण : अर्जुना, लवंगी फटाके हे लहान मुलांसाठी दिले जातात. जीएसटीमध्ये कंपोझिशन स्कीममध्ये जाणाºया करदात्यांना लवंगी फटाके दिले जातील. लहान करदाते ज्यांची वार्षिक उलाढाल रुपये १ कोटीपेक्षा कमी आहे, ते कंपोझिशन स्कीमअंतर्गत कर भरू शकतात. म्हणजेच, त्यांच्यासाठी १ टक्के, २ टक्के किंवा ५ टक्के कर दराचे लवंगी फटाके उपलब्ध आहेत.अर्जुन : कृष्णा, या फटाक्यांच्या स्टॉलमधील फॅन्सी फटाके कोणते?कृष्ण : अर्जुना, फॅन्सी फटाक्यांची प्रखरता आणि आवाज खूप असतो. हा फटाका भारतात खूप मोठा आवाज करतो, परंतु याची वात विदेशात असते. हा फटाका म्हणजे आयातीवरील आयजीएसटी होय. म्हणजेच फॅन्सी फटाके जसे विदेशातून येतात आणि भारतात फुटतात, त्याचप्रमाणे विदेशातून आयात झालेल्या वस्तू किंवा सेवांवर भारतात आयजीएसटी भरावा लागतो.अर्जुन : कृष्णा, करदात्याने यातून काय बोध घ्यावा?कृष्ण : अर्जुना, दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव आहे. सर्वांनी हा सण आनंदाने साजरा करावा. प्रत्येक भारतीय करदात्याने कायद्याचे पालन केल्यास, देश प्रकाशमान होईल. म्हणजेच कायद्याचे पालन केले, तर ‘दिवाळी’ आणि नाही केले, तर ‘दिवाळे’.
जीएसटीच्या ‘फटाका स्टॉल’चा आनंद घ्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 1:02 AM