>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ५ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोन्यासंदर्भातील तीन महत्त्वाकांक्षी योजनांचा गुरुवारी शुभारंभ केला. गोल्ड मॉनिटायझेशन स्किम, गोल्ड बाँड आणि अशोक चिन्हाचे चित्र असलेले सोन्याच्या शिक्क्यांचे मोदींच्या हस्ते अनावरण करण्यात आले असून देशात पडून असलेले २० हजार टन सोने वापरात आणण्याचा प्रयत्न या योजनांमधून केला जाणार आहे.
गुरुवारी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या योजनांची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी मोदी म्हणाले, सोने विकत घेण्यात भारत अग्रस्थानी असून या स्पर्धेत आपण चीनलाही मागे टाकले आहे. भारताने आत्तापर्यंत ५६२ टन सोने आयात केले असून चीनमध्ये हेच प्रमाण ५४८ टनएवढे आहे. देशातील घराघरात, संस्थांमध्ये सुमारे २० हजार टन सोने पडून हे सोने वापरात आणले भारतावरील गरीब देशाचा टॅग दूर होईल असा दावाही त्यांनी केला आहे. महिलांकडे सोन्याशिवाय दुसरी संपत्ती नसते. त्यामुळे या तिन्ही योजना महिलांमुळे यशस्वी होऊ शकतात व यातून त्यांना आर्थिक सुरक्षाही मिळेल असा विश्वास मोदींनी केला. गरजेच्या वेळी सोने विकता येते अशी सर्वसामान्यांची समजूत असते. मध्यरात्री गरज पडल्यास तुम्ही सोने विकू शकणार नाही, मात्र सोने बाँड देऊन रुग्णालयातील बिल फेडू शकता असे उदाहरण देत त्यांनी या योजनांचे महत्त्व पटवून दिले.
काय आहेत या योजना ?
गोल्ड मॉनिटायझेशन स्किम (जीएमएस)- जीएमएस योजनेत लोकांना त्यांच्याकडील सोने जमा करुन त्यावर २.५ टक्के व्याज घेता येईल. यात किमान ३० ग्रॅम सोने जमा करणे बंधनकारक असेल.
सुवर्ण बाँड योजना - या योजनेत गुंतवणूकदार बाँड पत्र विकत घेऊन दरवर्षी २.७५ टक्केएवढा व्याज घेऊ शकतील. यात किमान दोन ग्रॅम व कमाल ५०० ग्रॅम सोन्याच्या मूल्याएवढी गुंतवणूक केली जाऊ शकते.
सोन्याचे शिक्के - ५ व १० ग्रॅमचे सोन्याचे शिक्के तयार करण्यात आले आहेत. यातील एका बाजूला महत्मा गांधी व दुस-या बाजूला अशोक चक्राचे चिन्ह आहे.