- प्रसाद गो. जोशी
देशातील कोरोना रुग्णांची कमी होत असलेली संख्या, रिझर्व्ह बँकेने सरकारला देऊ केलेली अतिरिक्त रक्कम आणि जागतिक बाजारांमध्ये निर्माण झालेले काहीसे सकारात्मक वातावरण यामुळे मुंबई शेअर बाजारामध्ये गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केली. परिणामी बाजारामध्ये वाढ झालेली दिसून आली. दरम्यानच्या काळामध्ये वाढलेला चलनवाढीचा दर आणि त्यामुळे बाजारावर आलेला विक्रीचा दबाव यामुळे काही काळ बाजार घसरला पण नंतर पुन्हा सावरत त्याने मोठी झेप घेतली.
वाढीव पातळीवर सुरू झालेल्या सेन्सेक्सने सप्ताहामध्ये ५०,५९१.१२ अशी उच्चांकी धडक दिली असली तरी नंतर तो काहीसा खाली आला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप या क्षेत्रीय निर्देशांकांनी उच्चांकी पातळीची नोंद केली आहे. चलनवाढीच्या दराने ११ वर्षांमधील उच्चांक गाठल्याने तसेच नोमुरा वित्तसंस्थेने चालू तिमाहीमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये घसरण होण्याची शक्यता व्यक्त केल्याने बाजारावर काही काळ विक्रीचा दबाव होता. पण नंतर तो दूर झाला. बँका आणि वित्तसंस्थांचे समभाग वाढले आहेत. परकीय वित्तसंस्था विक्रीच्या मुडमध्ये असताना देशी वित्तसंस्थांनी खरेदी केली.
देशांतर्गत वित्तीय संस्थांनी केली खरेदी
n गतसप्ताहामध्ये परकीय वित्तसंस्थांनी विक्रीचा धडाका चालूच ठेवला असून त्यांनी मोठी विक्री केली. मात्र, देशांतर्गत वित्तसंस्थांनी खरेदीला प्रारंभ केला आहे. सप्ताहभरामध्ये परकीय वित्तसंस्थांनी १७५३.९ कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली. मे महिन्यामध्ये या संस्थांनी १०,४६७.१५ कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली आहे. देशांतर्गत वित्तसंस्थांककडून मात्र गतसप्ताहात १३१८.५२ कोटी रुपयांची खरेदी केली गेली आहे. या महिन्यामध्ये त्यांची खरेदी २२०९.७२ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
गतसप्ताहातील स्थिती
निर्देशांक बंद मूल्य बदल
सेन्सेक्स ५०,५४०.४८ १८०७.९३
निफ्टी १५,१७५.३० ४९७.५०
मिडकॅप २१,४८५.७५ ९७७.९६
स्मॉलकॅप २३,१३०.४० ९२९.८६
आगामी सप्ताहात फारशा महत्त्वाच्या घडामोडी नाहीत. गुरुवारी होणारी एफ ॲण्ड ओ व्यवहारांची सौदापूर्ती बाजारामध्ये काही वध-घट घडवू शकते. याबरोबरच कोरोनाचे रुग्ण आणि जागतिक बाजारांमधील शेअर्सची परिस्थिती याचा परिणामही भारतातील शेअर बाजारावर होण्याची शक्यता आहे.