लोकमत न्यूज नेटवर्कसोलापूर : यंत्रमाग उद्योजक सध्या मेटाकुटीला आले आहेत. यंदा विदेशातून चांगली मागणी येत असताना पुन्हा एकदा लॉकडाऊन पडल्यामुळे सर्व उद्योजकांनी धास्ती घेतली आहे. हातात काही ऑर्डर्स आहेत, पण प्रशासकीय जाचक अटीमुळे उद्योजकांना टेक्सटाइलचे उत्पादन घेता येईना. यात पोलीस आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून वारंवार कारवाईची भीती दाखवली जात असल्याने अक्कलकोटरोड, एमआयडीसी येथील ९० टक्के यंत्रमाग उद्योजक कारखाने बंद ठेवणे पसंत केले. त्यामुळे ३५ हजारांहून अधिक कामगारांची अडचण झाली आहे.
एप्रिलमध्ये लॉकडाऊन जाहीर होताना प्रशासनाने जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन घेणाऱ्या कारखान्यासोबत इतर उद्योगालाही मुभा दिली आहे. कामगारांना आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक केले आहे. त्यासोबत कारखान्यात कामगारांची राहण्याची सोय केल्यास कारखाने चालविण्यास प्रशासकीय परवानगी असणार आहे. त्यामुळे कामगारांना कारखान्यातून घरी जाण्याची परवानगी असणार नाही. सदर अट उद्योजकांना अमान्य आहे.ज्यांच्या हातात ऑर्डर्स आहेत. ते मोठ्या नियोजनपद्धतीने आणि शिस्तीने कारखाने सुरू ठेवत आहेत. प्रशासनाच्या सूचनेनुसार कामगारांचे कोरोना टेस्ट करून घेत आहेत. काही कारखान्यांमध्ये कामगारांना राहण्याची व्यवस्थादेखील करण्यात आली आहे, तर दुसरीकडे प्रशासकीय नियम व अटी जाचक असल्याचे सांगत ९० टक्के कारखानदार कारखाने बंद ठेवण्याचे पसंत केले. बहुतांश उद्योजक छोटे कारखानदार असल्यामुळे त्यांना कामगारांची राहण्याची व जेवणाचा खर्च परवडणार नाही. त्यामुळे प्रशासनाने सदर नियम शिथिल करावे, असे उद्योजकांचे म्हणणे आहे.जे कारखानदार नियम व अटींचे पालन करत कारखाने चालू ठेवत आहेत, त्यांना पोलीस व महापालिकेच्या भरारी पथकांकडून त्रास दिला जात असल्याचेही तक्रारी येत आहेत. चालू असलेल्या कारखान्यामध्ये भरारी पथक वारंवार जाऊन दंड असल्याने कारखानदार मेटाकुटीला आले आहेत.
जाचक अटी शिथिल करा..कामगारांची रोजीरोटी थांबू नये, सोलापूरची आर्थिक घडी विस्कटू नये असे जर प्रशासनाला वाटत असेल तर प्रशासनाने यंत्रमाग उद्योजकांना सहकार्य करावे. प्रशासनाच्या जाचक अटी काही प्रमाणात शिथिल झाल्यास आम्ही कारखाने पूर्ववत सुरू करू. कामगारांना घरी जाण्याची परवानगी द्यावी. बहुतांश कारखानदार छोटे कारखानदार आहेत. त्यांना कामगारांना कारखान्यात थांबून घेणे परवडणार नाही. कामगारांची कोरोना टेस्ट करून घेऊ. प्रशासनाने कारवाईची भीती आम्हाला दाखवू नये. कारवाईच्या भीतीने ९० टक्के छोटे कारखानदार कारखाने बंद करून घरीच बसलेत. यामुळे कामगार तसेच कारखानदारांनाही मोठा फटका बसतोय, अशी प्रतिक्रिया सोलापूर जिल्हा यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम व टेक्स्टाइल निर्यातदार राजेश गोसकी यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.