कोल्हापूर : महाराष्ट्रासारखे औद्योगिक वातावरण देशात कुठेही नाही. त्यामुळे कर्नाटक स्थलांतरणबाबतचा बेत उद्योजक रद्द करतील, अशी अपेक्षा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी गुरुवारी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. कर्नाटक सरकारने निपाणीजवळील तवंदी घाटाच्या परिसरातील ८०० एकर जागा पश्चिम महाराष्ट्रातील उद्योजकांना देण्याची तयारी दर्शविली आहे. या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री देसाई आणि पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला. यावेळी उद्योगमंत्री देसाई म्हणाले, कर्नाटकने जरी पश्चिम महाराष्ट्रातील उद्योजकांना उद्योगांसाठी जमीन देऊ केली असली तरी उद्योजक तेथे जाणार नाहीत. कारण, महाराष्ट्रासारखे औद्योगिक वातावरण देशात कुठेही नाही. महाराष्ट्र तो महाराष्ट्र आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्रामधील फरक उद्योजकांना समजेल. त्यातून ते कर्नाटकचा बेत रद्द करतील, अशी मला अपेक्षा आहे. उद्योजकांचे प्रश्न प्रलंबित आहेत, हे मान्य आहे. ते सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सध्या वीजदराचा प्रश्न मोठा असून तो सोडविण्यासाठी मी पुढाकार घेतला आहे. उद्योजकांशी चर्चा करून, बोलून प्रश्न सोडविले जातील. कर्नाटकच्या विचारात असलेल्या उद्योजकांशी चर्चा केली जाईल.
उद्योजक स्थलांतरणाचा बेत रद्द करतील -देसाई
By admin | Published: February 05, 2016 3:18 AM