Join us

Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 10:04 AM

Adani Group Adani Ports share : गौतम अदानी समूहाचा हा शेअर बीएसई सेन्सेक्स निर्देशांकातील ३० शेअर्समध्ये सामील होणार आहे. सेन्सेक्स सेगमेंटमध्ये अदानी पोर्ट्स विप्रोची जागा घेईल. पाहा याशिवाय आणखी कोणते शेअर्स घेणार कोणाची जागा.

Adani Group Adani Ports share : गौतम अदानी समूहाचा अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन २४ जूनपासून बीएसई सेन्सेक्स निर्देशांकातील ३० शेअर्समध्ये सामील होणार आहे. सेन्सेक्स सेगमेंटमध्ये अदानी पोर्ट्स विप्रोची जागा घेणार आहे. आयआयएफएल अल्टरनेटिव्ह रिसर्चनं या घोषणेपूर्वी एका नोटमध्ये, भारतातील चौथ्या क्रमांकाची आयटी कंपनी विप्रो बाहेर पडल्यानंतर ५०० कोटी रुपये काढले जाऊ शकतात, असा अंदाज व्यक्त केला होता. एस अँड पी डाऊ जोन्स इंडेक्स आणि बीएसईचा संयुक्त उपक्रम एशिया इंडेक्सनं हे बदल जाहीर केले आहेत. सोमवार, २४ जून २०२४ पासून हे बदल लागू होतील, असं एशिया इंडेक्सनं म्हटलं आहे. 

आणखी कंपन्यांवर निर्णय 

याशिवाय टाटा समूहाची कंपनी ट्रेंट लिमिटेड सेन्सेक्स ५० मध्ये प्रवेश करणार आहे. हे डिवीज लॅबोरेटरीज लिमिटेडची जागा घेईल. त्याचप्रमाणे पेज इंडस्ट्रीज, एसबीआय कार्ड्स, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स, ज्युबिलंट फूडवर्क्स, झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस यापुढे एस अँड पी बीएसई 100 निर्देशांकाचा भाग नसतील आणि त्यांची जागा आरईसी लिमिटेड, एचडीएफसी एएमसी, कॅनरा बँक, कमिन्स इंडिया, पंजाब नॅशनल बँक घेतील. एयू स्मॉल फायनान्स बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक यापुढे २४ जूनपासून बीएसई बँकेक्सचा भाग नसतील आणि त्यांची जागा येस बँक, कॅनरा बँक घेतील. 

अदानी पोर्ट्सच्या शेअर्सची स्थिती 

अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडचा शेअर शुक्रवारच्या व्यवहारात घसरून १४१६.१० रुपयांवर आला. "या शेअरमध्ये १५५० रुपयांचं टार्गेट गाठण्याची क्षमता आहे. स्टॉपलॉस १,४०० रुपये ठेवला पाहिजे," असं रेलिगेअर ब्रोकिंगचे रवी सिंग यांनी बिझनेस टुडेला सांगितलं. तर आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्स जिगर एस पटेल यांच्या म्हणण्यानुसार, एका महिन्यासाठी अपेक्षित ट्रेडिंग रेंज १,३५० ते १,५०० रुपयांच्या दरम्यान असेल. 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :गौतम अदानीविप्रोशेअर बाजार