EPF Calculation : खाजगी क्षेत्रात काम करणारे कर्मचारी अनेक योजनांमध्ये गुंतवणूक करुन निवृत्तीसाठी भरपूर पैसे वाचवण्याचा प्रयत्न करतात. कुणी म्युच्युअल फंडात पैसे गुंतवतो, तर कुणी इतर सरकारी योजनांमध्ये पैसे गुंतवतो. दरम्यान, तुमच्याकडे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) खात्याचा पर्याय आहे, ज्याद्वारे तुम्ही सेवानिवृत्तीपर्यंत करोडो रुपये मिळवू शकता.
निवृत्तीपर्यंत पीएफ खात्यात कोट्यवधी रुपये जमा करण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या खात्यातून तुम्ही कधीही पैसे काढले नाहीत, तरच सेवानिवृत्तीपर्यंत करोडो रुपये जमा होतील. तुम्ही पैसे काढत असाल, तर तुमच्या मासिक पगारातून पीएफमधील योगदान वाढवा, जेणेकरून पीएफ खात्यात कोट्यवधी रुपये जमा करता येतील. पीएफ खात्यात कोट्यवधी रुपये कसे जमा करायचे, याचे गणित समजून घेऊ.
50 हजार रुपयांच्या पगारावर इतके कोटी रुपये जमा होणार
तुमचा मूळ पगार + DA यासह एकूण मासिक पगार 50,000 रुपये असेल आणि तुम्ही पीएफ खात्यात दरमहा 12 टक्के योगदान देत असाल तर...समजा तुमचे वय 30 वर्षे आहे आणि सरकारने दिलेले व्याज 8.1 टक्के आहे. यासोबतच तुमचा पगार वार्षिक आधारावर 5 टक्क्यांनी वाढल्यास निवृत्तीपर्यंत 2 कोटी 56 लाख 46 हजार 997 रुपये होतील. ही रक्कम निवृत्तीनंतर तुमचे जीवन सुकर करेल.
किती योगदान द्यावे लागेल?
कोणताही नियोक्ता कर्मचाऱ्याच्या पीएफ खात्यात कर्मचाऱ्याने त्याच्या पगारातून जमा केलेल्या रकमेइतकीच रक्कम योगदान देतो. सध्या कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात पगाराच्या 12 टक्के योगदान दिले जाते आणि तेवढेच योगदान नियोक्ता देखील देतो. तुम्ही हे योगदान वाढवू शकता. याशिवाय सरकारने पीएफमध्ये जमा केलेल्या रकमेवर वार्षिक 8.25 टक्के व्याज निश्चित केले आहे.
पेन्शन मिळवण्याचे नियम काय आहेत?
ईपीएफओ कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शनही देते. ईपीएफओच्या नियमांनुसार, कोणत्याही कर्मचाऱ्याला 10 वर्षे काम केल्यानंतर पेन्शन मिळू शकते. ही योजना 58 वर्षे वयापर्यंत पोहोचलेल्या पात्र कर्मचाऱ्यांना पेन्शन लाभाची हमी देते. नियम बघितले तर 9 वर्षे आणि 6 महिन्यांची सेवादेखील 10 वर्षात गणली जाते. कर्मचाऱ्यांचा संपूर्ण हिस्सा पीएफ खात्यात जमा केला जातो, तर नियोक्त्याचा 8.33% हिस्सा कर्मचारी पेन्शन योजनेत (ईपीएस) जातो आणि 3.67% दरमहा EPF योगदानामध्ये जातो.