Join us

महागाईचा भडका! सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार; 'या' 5 गोष्टींमुळे फटका बसणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 6:00 PM

होळीच्या आधी सर्वसामान्यांना पाच मोठे झटके बसणार आहे.

नवी दिल्ली - सण-समारंभांना आता सुरुवात झाली आहे. मोठ्या उत्साहात आता 18 मार्चला होळी साजरी केली जाणार आहे. पण होळीच्या आधी सर्वसामान्यांना पाच मोठे झटके बसणार आहे. महागाईचा भडका उडणार असून लोकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. यामध्ये प्रामुख्याने ईपीएफवरील व्याजदरात कपात, दुधाचे वाढलेले दर यासारख्या रोजच्या व्यवहारातील काही गोष्टींचा समावेश आहे. याचा परिणाम हा नागरिकांवर होणार असून खिशाला फटका बसणार आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया...

EPF वर व्याजदरात कपात

या महिन्याच्या 12 तारखेला, EPFO ​​च्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजने आर्थिक वर्ष 2021-22 साठी PF खात्यातील ठेवींवरील व्याजदर 8.1 टक्के कमी करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे ईपीएफओच्या 6 कोटी ग्राहकांना धक्का बसला आहे. या निर्णयाला अर्थ मंत्रालयाने अद्याप मान्यता दिलेली नाही. यापूर्वी, गेल्या आर्थिक वर्षात, EPFO ​​ने आपल्या ग्राहकांना 8.5 टक्के व्याज दिले होते.

दुधाचा भाव वाढला

या महिन्याच्या सुरुवातीलाच दुधाच्या दरात वाढ झाली आहे. सर्वप्रथम अमूल त्यानंतर पराग आणि मदर डेअरीनेदेखील दुधाचा दर हा प्रति लीटर दोन रुपयांनी वाढवला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना आता दूध विकत घेताना जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. 

घाऊक महागाईची आकडेवारी

सरकारने फेब्रुवारी महिन्याची घाऊक महागाईची आकडेवारी सोमवारी जाहीर केली. सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, घाऊक किमतीवर आधारित महागाई दर गेल्या महिन्यात 13.11 टक्क्यांवर पोहोचला आहे. घाऊक किमतीवर आधारित महागाई सलग 11व्या महिन्यात वाढल्याने सर्वसामान्यांना याचा धक्का बसला आहे.

सीएनजीच्या किमती वाढल्या

उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका संपताच दिल्ली-एनसीआरसह अनेक शहरांमध्ये सीएनजीच्या किमती 50 पैसे ते एक रुपयापर्यंत वाढल्या आहेत. यानंतर राजधानी दिल्लीत सीएनजीची किंमत 57.01 रुपये प्रति किलोवरून 50 पैशांनी वाढून 57.51 रुपये प्रति किलो झाली आहे.

व्यावसायिक एलपीजी महाग झाला

ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी महिन्याच्या पहिल्या दिवशी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली होती. दिल्लीत कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 105 रुपयांनी वाढ केली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :पैसाव्यवसाय