नवी दिल्ली : २०२०-२१ या वित्त वर्षात मागील वर्षाप्रमाणे ईपीएफच्या व्याजदरात कपात होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास वेतनधारक कर्मचाऱ्यांना मोठा फटका बसणार आहे.ईपीएफचे असंख्य सदस्य गेल्या वर्षीचे व्याज अजूनही न मिळाल्याने आधीच हैराण आहेत. व्याजदर कपातीमुळे त्यांच्यावर दुहेरी आघात होणार आहे. उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, कोरोना संकटकाळात लोकांनी मोठ्या प्रमाणात ईपीएफ काढून घेतला आहे. लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्यामुळे ईपीएफला मिळणारे योगदानही घटले आहे. त्यामुळे कर्मचारी भविष्य निधी संघटनेकडून (ईपीएफओ) व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. ४ मार्च रोजी होणाऱ्या ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या बैठकीत दरकपातीबाबतचा निर्णय घेतला जाऊ शकतो. ईपीएफओचे विश्वस्त के. ई. रघुनाथन यांनी सांगितले की, ४ मार्च रोजी श्रीनगर येथे विश्वस्त मंडळाची बैठक होईल. बैठकीची कार्यक्रम पत्रिका लवकरच मिळू शकते.
गतवर्षीही झाली होती व्याजदरात कपातवित्त वर्ष २०२० मध्ये ईपीएफवर ८.५ टक्के व्याज मिळाले. हे सात वर्षांतील सर्वांत कमी व्याज आहे. याआधी वित्त वर्ष २०१३ मध्ये ८.५ टक्के व्याजदर मिळाला होता. वित्त वर्ष २०१९ मध्ये ८.६५ टक्के दराने व्याज देण्यात आले होते. वित्त वर्ष २०१८ मध्ये ८.५५ टक्के आणि वित्त वर्ष २०१६ मध्ये ८.८ टक्के व्याजदर होता. त्याआधी वित्त वर्ष २०१४ मध्ये ८.७५ टक्के दराने व्याज देण्यात आले होते. ईपीएफचे देशभरात सहा कोटी सदस्य आहेत. त्यातील कोट्यवधी लोकांना केवायसी समस्येमुळे वित्त वर्ष २०२० चे व्याज अजूनही मिळालेले नाही.