नवी दिल्ली : जर तुम्ही पीएफ खातेधारक असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कर्मचारीभविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आपल्या सर्व ग्राहकांना अलर्ट जारी केला आहे. ईपीएफओने आपल्या 6 कोटी पीएफ (PF) खातेधारकांना वैयक्तिक माहिती आणि कोणत्याही प्रकारचे अॅप डाऊनलोड करण्याबाबत सतर्क केले आहे. ईपीएफओने आपल्या ट्विटर हँडलवर याबाबतची माहिती दिली आहे. (epfo alert pf account holders)
कोणत्याही नोकरदार व्यक्तीसाठी, त्याच्या पीएफ निधीची रक्कम सर्वात महत्वाची असते. ही रक्कम भविष्यातील सुरक्षिततेसाठी सर्वात महत्वाचा निधी आहे. यामध्ये पैसे जमा केले जातात, तसेच त्या पीएफवर व्याज देखील मिळते. अशा परिस्थितीत, तुम्ही तुमच्या पीएफ पैशांबाबत खूप सतर्क असणे आवश्यक आहे.
जाणून घ्या, EPFO ने काय म्हटले आहे?
ईपीएफओने आपल्या खातेधारकांना कोणत्याही बनावट कॉल्सपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. ईपीएफओने अलर्टमध्ये म्हटले आहे, "ईपीएफओ कधीही फोन कॉलवर आपल्या खातेधारकांकडून यूएएन नंबर, आधार क्रमांक, पॅन नंबर किंवा बँक तपशील विचारत नाही किंवा ईपीएफओ त्याच्या खातेधारकांना कोणताही फोन कॉल करत नाही."
#EPFO never asks it's members to share their personal details like Aadhaar, PAN, UAN, Bank Account or OTP over phone or on social media. Stay alert & beware of fraudsters. #SocialSecurity#PF#ईपीएफ#Employees#Servicespic.twitter.com/iVkDbARTzH
— EPFO (@socialepfo) October 9, 2021
...तर होईल मोठे नुकसान
अशा परिस्थितीत, ईपीएफओच्या नावाने येणाऱ्या फोन कॉल्सपासून नेहमी सतर्क रहा. यासोबतच ईपीएफओने बनावट वेबसाईट टाळण्याचा सल्लाही दिला आहे. जर तुम्ही ईपीएफओच्या अलर्टकडे दुर्लक्ष केले तर तुम्हाला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल आणि तुमच्यासोबत फसवणूक होऊ शकते.
बँकेकडूनही वेळोवेळी अलर्ट
दरम्यान, बँक देखील आपल्या ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी दररोज अलर्ट जारी करते. बँक आपल्या ट्विटर हँडल आणि एमएमएसद्वारे ग्राहकांना अलर्ट पाठवत राहते.
बँकिंग फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ
लॉकडाऊन दरम्यान बँकिंग फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आरबीआयच्या अहवालानुसार, डिजिटल व्यवहारांमुळे वर्ष 2018-19 मध्ये 71,543 कोटी रुपयांची बँकिंग फसवणूक झाली आहे. या काळात बँक फसवणुकीची 6800 हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली. 2017-18 मध्ये बँक फसवणुकीची 5916 प्रकरणे नोंदवली गेली. यामध्ये 41,167 कोटी रुपयांपेक्षा जास्त फसवणूक झाली. गेल्या 11 आर्थिक वर्षांमध्ये बँक फसवणुकीची एकूण 53,334 प्रकरणे नोंदवली गेली आहेत, तर त्यांच्या माध्यमातून 2.05 लाख कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे.