Join us

ईपीएफओवरील व्याजदरात वाढ, मिळणार जबरदस्त फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2019 9:08 AM

भविष्य निर्वाह निधी संघटनेनं (ईपीएफओ) 2018-19 या वित्त वर्षासाठी व्याजदर वाढवला असून,  8.55 टक्के असलेला व्याजदर वाढवून तो 8.65 टक्के इतका करण्यात आला आहे.

नवी दिल्ली : भविष्य निर्वाह निधी संघटनेनं (ईपीएफओ) 2018-19 या वित्त वर्षासाठी व्याजदर वाढवला असून,  8.55 टक्के असलेला व्याजदर वाढवून तो 8.65 टक्के इतका करण्यात आला आहे. केंद्रीय वित्त मंत्रालयानं या व्याजदरवाढीला मंजुरी दिल्यानंतर देशातील सहा कोटी पीएफ धारकांना याचा लाभ पोहोचणार आहे. पीएफओच्या विश्वस्त मंडळाची बैठक 21 फेब्रुवारीला झाली. या बैठकीत यंदाचा व्याजदर ठरवण्यात आला. 2017-18 या वित्त वर्षात ईपीएफओ सदस्यांना 8.55 टक्के व्याजदर दिला गेला होता.लोकसभेच्या निवडणुका लक्षात घेता यंदाही तो व्याजदर वाढवून 8.65 इतका केला आहे. केंद्रीय श्रममंत्र्यांच्या नेतृत्वाखालील विश्वस्त मंडळ ईपीएफओचे सर्व धोरणात्मक निर्णय घेते. त्यात व्याजदराचाही समावेश आहे. ईपीएफओ सदस्यांच्या जमा ठेवीवर किती व्याजदर द्यायचा हे दरवर्षी ठरविले जाते. केंद्रीय श्रममंत्र्यांच्या नेतृत्वाखालील विश्वस्त मंडळाच्या या बैठकीत सर्वानुमते 0.10 टक्के व्याजदरात वाढ करण्याचे ठरले.‘सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज’ ( सीबीटी) ही ईपीएफओची निर्णय घेणारी प्रमुख समिती व्याजदरात होणाऱ्या बदलाबाबतचा निर्णय घेत असते. विश्वस्त मंडळाने ठरविलेल्या व्याजदरावर वित्त मंत्रालयाची मंजुरी घ्यावी लागते. वित्त मंत्रालयाने मोहर उठविल्यानंतर व्याजदर लागू होतात. व्याजाची रक्कम संबंधित सदस्यांच्या खात्यावर जमा होते. 2017-18 मध्ये देण्यात आलेला 8.55 टक्के व्याजदर हा पाच वर्षांतील सर्वांत कमी व्याजदर होता. 2016-17 मध्ये 8.65 टक्के आणि 2015-16मध्ये 8.80 टक्के व्याजदर सदस्यांना मिळाला होता. त्याआधी 2013-14 आणि 2014-15 या वर्षांत 8.75 टक्के व्याजदर मिळाला होता. 2012-13मध्ये 8.5 टक्के व्याजदर दिला गेला होता.

टॅग्स :भविष्य निर्वाह निधी