नोकरदारांच्या पगाराचा काही भाग दरमहा ईपीएफमध्ये जमा केला जातो. ईपीएफओ खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या पीएफचे व्यवस्थापन करते. ईपीएफमधील गुंतवणूक पूर्णपणे जोखीममुक्त आहे. साधारणपणे, त्याचा व्याजदर देखील इतर गुंतवणूकीच्या पर्यायांपेक्षा अधिक असतो. कर्मचार्यांना पीएफच्या रकमेवर व्याज देण्यासाठी EPFO अनेक ठिकाणी हे पैसे गुंतवते. यामध्ये शेअर्स आणि शेअर्सशी संबंधित उत्पादनांचाही समावेश आहे.
श्रम आणि रोजगार मंत्रालयाने 8 ऑगस्ट रोजी लोकसभेत EPFO आपल्या किती पैशांची शेअर्समध्ये गुंतवणूक करतं याबाबत माहिती दिली. एका प्रश्नाच्या उत्तरात मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. EPFO आपल्या निधीपैकी 85 टक्के निधी डेट इंन्स्ट्रूमेंटमध्ये गुंतवते. फंडाच्या 15 टक्के रक्कम एक्सचेंज ट्रेडेड फंड (ETFs) मध्ये गुंतवली जाते. यासाठी सरकारने गुंतवणुकीचा आकृतिबंध निश्चित केला आहे, अशी माहिती कामगार आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी दिली.
ही गुंतवणूक निफ्टी 50, सेन्सेक्स, सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्रायझेस (CPSE) आणि भारत 22 वर आधारित ईटीएफमध्ये केली जाते. आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये, EPFO ने एकूण 2,20,236.47 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती, त्यापैकी 31,501.09 कोटी रुपये ईटीएफमध्ये गुंतवले होते. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये, EPFO ने एकूण 2,18,533.89 कोटी रुपयांची गुंतवणूक केली, त्यापैकी 32,070.84 कोटी रुपये ईटीएफमध्ये गुंतवले गेले. 2021-22 या आर्थिक वर्षात (जून 2022 पर्यंत), EPFO ने एकूण 84,477.67 कोटी रुपयांची गुंतवणूक केली, त्यापैकी 12,199.26 कोटी रुपये ईटीएफमध्ये गुंतवले गेले, अशी माहिती त्यांनी सांगितली.
तीन वर्षांत पैसे कुठे गुंतवले?
10 खासदारांनी कामगार आणि रोजगार मंत्रालयाला EPFO निधीच्या गुंतवणुकीबाबत विचारणा केली होती. यामध्ये गोरखपूरचे खासदार रवी किशन आणि पूर्व दिल्लीचे खासदार मनोज तिवारी यांचा समावेश होता. गेल्या तीन आर्थिक वर्षांत ईपीएफओने आपला पैसा कुठे गुंतवला, असा सवालही त्यांनी केला.
पोर्टफोलिओ व्यवस्थापक आणि ईटीएफ उत्पादक ही गुंतवणूक करतात. त्यांची नियुक्ती EPFO च्या केंद्रीय विश्वस्त मंडळाद्वारे (CBT) त्याच्या कामासाठी केली जाते, असे तेली यांनी या प्रश्नांची उत्तरे देताना सांगितले. EPFO चे वित्तीय सल्लागार आणि बाह्य समवर्ती लेखा परीक्षक सर्व गुंतवणुकीवर लक्ष ठेवतात. ही गुंतवणूक सरकारने जारी केलेल्या सूचनांनुसार केली जात आहे की नाही याची ते खात्री करतात. EPFO च्या सीबीटीद्वारे गुंतवणूक मार्गदर्शक तत्त्वे देखील जारी केली जातात, असंही त्यांनी नमूद केलं.