नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) खातेधारकांसाठी ई-नॉमिनेशन अनिवार्य केले आहे. खातेधारक ई-नॉमिनेशनशिवाय पीएफ पासबुक पाहू शकणार नाहीत. आतापर्यंत तसे करण्याची गरज नव्हती. पण, आता पीएफ खात्यातील बॅलन्स तपासण्यासाठी ई-नॉमिनेशन अनिवार्य आहे. खातेधारक आतापर्यंत ई-नॉमिनेशन न करताही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेच्या वेबसाइटवर जाऊन पीएफ बॅलन्स आणि पासबुक सहज तपासू शकत होते.
ईपीएफ खात्यात ई-नॉमिनेशनसाठी, नॉमिनीचे नाव आधी द्यावे लागेल. त्याचा पत्ता आणि खातेदाराशी असलेले नाते नमूद करावे लागेल. नॉमिनीच्या जन्मतारखेसोबत हे देखील सांगावे लागेल की पीएफ खात्यात किती टक्के रक्कम जमा केली जाईल. जर नॉमिनी अल्पवयीन असल्यास त्याच्या पालकाचे नाव आणि पत्ता देणे आवश्यक आहे. नॉमिनी व्यक्तीची स्वाक्षरी किंवा अंगठ्याचा ठसा आवश्यक आहे.
कोणत्याही बचत योजना खात्याच्या बाबतीत नॉमिनेशन अनिवार्य आहे. यामुळे खातेदाराच्या मृत्यूनंतर पैसे त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवले जातात, ज्या व्यक्तीला खातेदाराला द्यायचे असतात. ईपीएफ आणि कर्मचारी पेन्शन योजनेच्या बाबतीतही नॉमिनेशन केले पाहिजे जेणेकरून ईपीएफओ सदस्याच्या अकाली मृत्यूनंतर, नॉमिनी व्यक्तीला हा निधी वेळेत मिळेल.
'या' पद्धतीने करू शकता ई-नॉमिनेशन
- तुमचा UAN आणि पासवर्ड टाकून EPF सदस्य पोर्टलवर लॉग इन करा.
- मॅनेज सेक्शनमध्ये जा आणि ई-नॉमिनेशन ऑप्शनवर क्लिक करा.
- प्रोफाइलमध्ये कायमस्वरूपी आणि तात्पुरता पत्ता टका आणि 'सेव्ह' बटणावर क्लिक करा. तुमचे कुटुंब आहे की नाही, हे देखील सिलेक्ट करा.
-कुटुंबातील सदस्यांचे आधार क्रमांक, नाव, जन्मतारीख, पत्ता, पालक (अल्प नॉमिनी असेल तर) यासंबंधी माहिती भरा आणि सेव्ह फॅमिली डिटेल्सवर क्लिक करा. जास्त नॉमिनी देखील जोडले जाऊ शकतात. कोणत्या नॉमिनीला रक्कम मिळेल हे देखील तुम्ही घोषित करू शकता.
- आधारचा व्हर्च्युअल आयडी टाकून 'व्हेरिफाय' वर क्लिक करा.
- आधार क्रमांक किंवा आधार व्हर्च्युअल आयडी टाकून 'ओटीपी मिळवा' वर क्लिक करा. आधारशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल.
- ईपीएफओमध्ये नॉमिनेशन पूर्ण करण्यासाठी ओटीपी टाका. त्यानंतर फिजिकल डॉक्युमेंट्स देण्याची गरज भासणार नाही.