Join us

मोदी सरकारने करुन दाखवलं? नव्या नोकऱ्यांमध्ये प्रचंड वाढ; आतापर्यंतचा रेकॉर्ड तोडला!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 1:51 PM

केंद्र सरकारकडून रोजगारांची आकडेवारी जाहीर करण्यात आली. पाहा, डिटेल्स...

नवी दिल्ली: कोरोना संकट काळानंतर आता हळूहळू सर्वच क्षेत्रे पूर्वपदावर येताना पाहायला मिळत आहेत. याचा सकारात्मक परिणाम अर्थव्यवस्थेवरही होताना दिसत आहे. खासगी असो वा सरकारी अनेकविध प्रकारच्या भरती प्रक्रिया सुरू आहेत. यातच आता देशात नवीन रोजगार संधींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. भविष्य निर्वाह निधी संघटनेअंतर्गत (EPFO) २०२१-२२ या वर्षात १ कोटी २२ लाख नवीन रोजगारांची नोंदणी झाली आहे. संघटीत क्षेत्रात एका वर्षात सर्वाधिक नोकऱ्या निर्माण झाल्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगितले जात आहे. 

केंद्र सरकारकडून रोजगारांची आकडेवारी जाहीर करण्यात आली. आर्थिक वर्ष २०२१-२२ या वर्षात एकूण १ कोटी २२ लाख नोकरीच्या संधी निर्माण झाल्या. एका वर्षात इतक्या मोठ्या संख्येने नोकऱ्या निर्माण होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्याआधी २०२०-२१ या वर्षात ७७ लाख १० हजार नोकऱ्या निर्माण झाल्या होत्या. २०१९-२० या वर्षात ७८ लाख आणि २०१८-१९ या वर्षात ६१ लाख १० हजार नोकऱ्यांची निर्मिती झाली होती.

जानेवारीपासून रोजगार निर्मितीमध्ये मोठी वाढ

ईपीएफओमध्ये नोंदणी करणाऱ्या आस्थापनांची संख्या देखील वाढली असल्याचे दिसून आले आहे. EPFO कडे मार्च महिन्यात १ लाख १८ हजार आस्थापनांनी पहिल्यांदाच कर्मचाऱ्यांसाठी PF चा भरणा केला. फेब्रुवारीत ७८ हजार १३३ आस्थापनांनी 'पीएफ'ची वजावट केली होती. मार्च महिन्यात नोकरी मिळवण्यात २०-२५ वयोगटातील उमेदवारांचे प्रमाण सर्वाधिक आहे. विशेष म्हणजे जानेवारीपासून रोजगार निर्मितीमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. मार्च २०२२ मध्ये देशभरात १५ लाख ३० हजार नवीन नोकरीच्या संधी निर्माण झाल्या. फेब्रुवारी २०२२ च्या तुलनेत त्यात १९.५ टक्के वाढ झाली. फेब्रुवारी महिन्यात १२ लाख ८० हजार रोजगार निर्माण झाले होते. 

टॅग्स :केंद्र सरकार