EPFO : जर तुम्ही नोकरी करत असाल आणि तुमचं ईपीएफ खातं असेल तर तुमच्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे. भविष्य निर्वाह निधीनं (EPFO) आपल्या नियमांमध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत. नव्या नियमांनुसार जर एखाद्या कर्मचाऱ्यानं एक नोकरी सोडून दुसरी नोकरी मिळवली तर त्याचं ईपीएफ खातं आपहून ट्रान्सफर होणार आहे.
आतापर्यंत हा नियम नव्हता. सहजरित्या सांगायचं झालं तर नोकरी बदलल्यानंतरही तुमचा ईपीएफ खाते क्रमांक तोच राहणार आहे. सध्या युएएन क्रमांक तोच राहतो परंतु ईपीएफ अकाऊंट नंबर बदलला जातो.
आता काय आहे प्रक्रिया?जर कोणत्याही ईपीएफ सदस्यानं आपली नोकरी बदलली तर नव्या कंपनीसह नवा ईपीएफ अकाऊंट उघडला जातो. अशा कर्मचाऱ्यांना आधीच्या कंपनीतील ईपीएफ खात्यातील रक्कम नव्या खात्यात ट्रान्सफर करावी लागते. मेंबर सर्व्हिस पोर्टलद्वारे ही प्रक्रिया करण्यात येते. परंतु यासाठी युएएन आणि आधार कार्ड लिंक असणं आवश्यक आहे. जर हे लिंक नसेल तर तुम्हाला नव्या कंपनीत एक फॉर्म जमा करून रक्कम ट्रान्सफर करावी लागते.
ट्रान्सफरची गरज का?ईपीएफ रकमेवर कर सूट तेव्हाच मिळते जेव्हा सलग पाच वर्षांची सेवा पूर्ण केलेली असते. मग ती एकाच कंपनीत केलेली असो किंवा अन्य कंपन्यांमध्ये केलेली असली तरी चालतं. जर तुमचा अकाऊंट ट्रान्सफर केला नसेल तर यापूर्वीच्या कंपनीत तुम्ही केलेलं काम त्या अवधीत सामील केलं जात नाही. जर यानुसार तुमची पाच वर्षे झाली नाहीत तर तुम्हाला त्या रकमेवर कर भरावा लागतो. नव्या नियमानुसार नोकरी बदलणाऱ्या लोकांना याचा फायदा होणार आहे. यासाठी ईपीएफओनं C-DAC द्वारे एकिकृत IT अनेबल्ड सिस्टम विकसित करण्याला मंजुरी दिली आहे.