EPFO News : ईपीएफओनं आपल्या कोट्यवधी सदस्यांना मोठी भेट दिली आहे. ईपीएफ स्कीम १९५२ अंतर्गत ईपीएफओनं घरं, विवाह आणि शिक्षणासाठी ऑटो क्लेम सेटलमेंट सुविधेची व्याप्ती वाढवली आहे. इतकंच नाही तर ऑटो क्लेम सेटलमेंट ची मर्यादा सध्याच्या ५०,००० रुपयांवरून १,००,००० रुपये करण्यात आली आहे. कामगार मंत्रालयानं सोमवारी यासंदर्भातील माहिती दिली.
ईपीएफओनं ऑटो क्लेम सोल्यूशन लॉन्च केलं आहे, ज्यामध्ये कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय आयटी प्रणालीद्वारे दाव्यांचा निपटारा आपोआप केला जाईल. २०२३-२४ या आर्थिक वर्षात ईपीएफओनं सुमारे ४.६ कोटी दाव्यांचा निपटारा केला आहे. त्यापैकी ६० टक्क्यांहून अधिक (२.८४ कोटी) दावे आगाऊ होते. या आजाराच्या उपचारासाठी अॅडव्हान्स क्लेम सेटलमेंटची ऑटो मोड सुविधा एप्रिल २०२० मध्ये सुरू करण्यात आली होती.
शिक्षण, लग्न, निवासासाठी ऑटो अॅडव्हान्स सुविधा
२०२३-२४ या आर्थिक वर्षात निकाली काढण्यात आलेल्या आगाऊ दाव्यांपैकी ८९.५२ लाख दावे असे होते, जे ऑटो मोडअंतर्गत निकाली काढण्यात आले होते. ईपीएफ योजना १९५२ अंतर्गत ऑटो क्लेमची सुविधा पॅरा ६८ के (शिक्षण आणि विवाहासाठी) आणि ६८ बी (गृहनिर्माण) पर्यंत वाढविण्यात आली आहे.
मानवी हस्तक्षेपाशिवाय तोडगा
ऑटो सेटलमेंटसाठी मानवी हस्तक्षेपाची गरज भासणार नाही. केवायसी, पात्रता आणि बँक व्हॅलिडेशनद्वारे केलेले दावे आयटी टूल्सद्वारे आपोआप प्रोसेस केले जातील. आगाऊ क्लेम सेटलमेंटसाठी लागणारा वेळ १० दिवसांवरून ३ ते ४ दिवसांवर आणला जाणार आहे.
रिटर्न/रिजेक्ट होणार नाही क्लेम
अॅडव्हान्ससाठी क्लेम सेटलमेंट आयटी प्रणालीद्वारे न केल्यास तो रिटर्न किंवा रिजेक्ट केला जाणार नाही, तर हा दावा दुसऱ्या स्तरावर स्क्रूटनी आणि अप्रुव्हलद्वारे निकाली काढला जाईल. या सुविधेच्या विस्तारामुळे घर, लग्न किंवा शिक्षणासाठी ऑटो क्लेमच्या सुविधेमुळे ईपीएफओ सदस्यांना कमी कालावधीत निधी उपलब्ध होणार आहे.