Join us

जुलै महिन्यात झाली नोकऱ्यांची बरसात, ईपीएफओकडे 11.62 लाख नव्या कर्मचाऱ्यांची नोंद 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 12:10 PM

अर्थजगतात आलेल्या सुस्तीमुळे सध्या देशात मंदीचे सावट घोंघावत आहे. अशा कठीण परिस्थितीत उद्योग जगतातून मोदी सरकारला दिलासा देणारी बातमी आली आहे.

ठळक मुद्देठीण परिस्थितीत उद्योग जगतातून मोदी सरकारला दिलासा देणारी बातमी जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीईपीएफओच्या नव्या आकडेवारीनुसार जुलै महिन्यात 11 लाख 62 हजार नव्या कर्मचाऱ्यांची नोंद

नवी दिल्ली -  अर्थजगतात आलेल्या सुस्तीमुळे सध्या देशात मंदीचे सावट घोंघावत आहे. अशा कठीण परिस्थितीत उद्योग जगतातून मोदी सरकारला दिलासा देणारी बातमी आली आहे. जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण झाले असून, कर्मचारीभविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात (ईपीएफओ)च्या नव्या आकडेवारीनुसार जुलै महिन्यात  11 लाख 62 हजार नव्या कर्मचाऱ्यांची नोंद झाली आहे. आकडेवारीचा विचार केल्यास रोजगार निर्मितीच्या बाबतील जुलै महिना हा या वर्षातील दुसरा सर्वाधिक रोजगार निर्मिती झालेला महिना ठरला आहे.  यावर्षी जून महिन्यामध्ये सर्वाधिक 12 लाख 23 हजार नवे रोजगार निर्माण झाले होते. दरम्यान, ईपीएफओच्या आकडेवारीनुसार जुलै महिना हा 10 लाखांहून अधिक रोजगार निर्मिती झालेला वर्षातील तिसरा महिना ठरला आहे. मात्र या आकडेवारीमध्ये काही हंगामी कर्मचाऱ्यांचा समावेश असण्याचीही शक्यता आहे. त्यांचा पीएफमधील वाटा पुढच्या महिन्यांमध्ये सुरू राहण्याची शक्यता नाही. दरम्यान, पीएफ कर्मचाऱ्यांची माहिती आधारकार्डशी जोडण्यात आल्याने त्याच्यावर देखरेख ठेवणे शक्य झाले आहे.  दरम्यान, रोजगारांची वाढलेली आकडेवारी मोदी सरकारला दिलासा देणारी ठरली आहे. कारण गेल्या काही काळापासून घटलेल्या रोजगार निर्मितीवरून केंद्र सरकार विरोधकांच्या रडारवर होते. मात्र पीएफकडून देण्यात येणाऱ्या आकडेवारीवर टीकाकार फारसा विश्वास ठेवत नाहीत. पीएफमध्ये नोंद झालेल्या व्यक्ती काही काळाने बाहेर पडू शकतात. किंवा काही वेळा जुन्याच कर्मचाऱ्यांची पीएफमध्ये नव्याने नोंद होते. त्यामुळे पीएफमध्ये नोंद झाली म्हणजे नवे रोजगार निर्माण झाले, असे होत नाही, असे टीकाकारांचे म्हणणे आहे.  ईपीएफओच्या आकडेवारीनुसार सप्टेंबर 2017 पासून आतापर्यंत देशात 1.14 कोटी नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. त्यामध्ये सप्टेंबर 2017 पासून मार्च 2018 पर्यंत केवळ 15.53 लाख नोकऱ्या निर्माण झाल्या होत्या.  मात्र 2019 च्या आर्थिक वर्षांत 61.12 लाख रोजगार निर्माण झाले आहेत. तसेच जुलै  2019 मध्ये 18 ते 21 वयोगटातील व्यक्तींमध्ये 3.27 रोजगार निर्माण झाले आहेत. तर 22 ते 25 वयोगटातील व्यक्तींना 3 लाख 23 हजार रोजगार मिळाले आहेत.  

टॅग्स :नोकरीकर्मचारीभविष्य निर्वाह निधीअर्थव्यवस्थासरकार