मुंबई: प्रोव्हिडंट फंडात गुंतवणूक करणाऱ्या देशातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सुरक्षित गुंतवणूक म्हणून अनेकजण पीएफमध्ये पैसे गुंतवतात. निवृत्तीनंतरची गुंतवणूक म्हणून पीएफमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचं प्रमाण लक्षणीय आहे. केंद्र सरकारनं काही दिवसांपूर्वीच ईपीएफओवरील व्याज दरात कपात करून तो ८.१ टक्क्यांवर आणला. यानंतर आता गुंतवणूकदारांना आणखी एक झटका बसणार आहे.
आतापर्यंत पीएफ करमुक्त होता. मात्र १ एप्रिलपासून त्यावर कर लागेल. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना ईपीएफओ खातेधारकांना धक्का दिला. १ एप्रिलपासून सुरू होत असलेल्या नव्या आर्थिक वर्षापासून वर्षाकाठी २.५ लाखांहून अधिक पीएफ जमा केल्यानंतर मिळणाऱ्या व्याजावर कर लागेल. त्यामुळे पीएफच्या माध्यमातून अधिक परतावा मिळवणाऱ्या खातेधारकांना आता व्याजावर कर भरावा लागेल.
नवा नियम काय?
नव्या नियमानुसार, वेगवेगळ्या पीएफमध्ये एका आर्थिक वर्षात २.५ लाखांपर्यंत जमा होणाऱ्या पैशांवरील व्याज करमुक्त असेल. २.५ लाखांहून अधिक योगदानावर मिळणाऱ्या व्याजावर कर्मचाऱ्यांना कर द्यावा लागेल. याचा फटका जास्त उत्पन्न असलेल्यांना बसेल.