Join us

संकट काळातही EPFO चा अदानींवर विश्वास कायम; तुमच्या व्याजावर होऊ शकतो परिणाम...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 7:21 PM

हिंडेनबर्ग रिपोर्ट आल्यानंतर अदानी समूह अडचणीत आला. अशा काळातही EPFO ची गुंतवणूक सुरू आहे.

EPFO on Adani Group: हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर गौतम अदानी यांच्या अदानी समूहाला मोठा धक्का बसला आहे. तरीदेखील भारतातील सर्वात मोठा रिटायरमेंट फंड- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) अदानी समूहामधील गुंतवणूक कायम ठेवत आहे. EPFO ची ही गुंतवणूक अदानी समूहाची प्रमुख कंपनी- अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी पोर्ट्समध्ये आहे. 

EPFO ची गुंतवणूक किती ?द हिंदूच्या रिपोर्ट्सनुसार, EPFO ​​आपल्या कॉर्पसपैकी 15 टक्के एक्सचेंज ट्रेडेड फंड्स (ETFs) मध्ये गुंतवणूक करते. मार्च 2022 पर्यंत EPFO ​​ने ETF मध्ये 1.57 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. तर चालू आर्थिक वर्षात 8,000 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. EPFO ​​कोणत्याही स्टॉकमध्ये थेट गुंतवणूक करत नाही. त्याऐवजी ईटीएफमध्ये गुंतवणूक करते. 

हा एनएसई निफ्टी आणि बीएसई सेन्सेक्सशी निगडीत एक्सचेंज आहे. एक्सचेंजमध्ये अदानी समूहाच्या दोन कंपन्या(अदानी पोर्ट्स आणि अदानी एंटरप्रायझेस) आहेत. आता EPFO ​​ने या एक्सचेंज म्हणजेच ETF मध्ये गुंतवणूक सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रिपोर्टनुसार, EPFO ​​सप्टेंबर 2023 पर्यंत गुंतवणुकीची प्रक्रिया सुरुच ठेवेल. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय विश्वस्त बैठकीत घेतला जाणार आहे. बैठकीत विरोधात निर्णय झाल्यास EPFO ​​ला आपला निर्णय बदलावा लागेल. EPFO चे व्यवस्थापन करणाऱ्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी दोन दिवसीय बैठक होत आहे. 

व्याजावरही परिणाम होईलअदानी समूहाच्या शेअर्सच्या घसरणीमुळे ईटीएफच्या परताव्यावरही परिणाम होण्याचा अंदाज आहे. असे झाल्यास ईपीएफओला ईटीएफमधील गुंतवणुकीवर कमी परतावा मिळेल. विशेष म्हणजे, ईपीएफओचे व्याजदरही याच परताव्यावर अवलंबून असतात. याचा अर्थ पीएफच्या व्याजदरावरही परिणाम होऊ शकतो. हिंडनबर्गच्या अहवालानंतर अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी पोर्ट्सचे शेअर्स 50 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. अशा स्थितीत याचा थेट परिणाम सामान्यांच्या खिशावर पडू शकतो.

टॅग्स :गौतम अदानीअदानीव्यवसायगुंतवणूक