नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफ) आपल्या सदस्यांच्या तक्रारींचा जलद गतीने निपटारा करण्यासाठी व्हॉट्सअॅप हेल्पलाइन सेवा सुरू केली आहे.
ईपीएफओच्या आधीच्याही काही तक्रार निवारण सेवा सुरू आहेत. ईपीएफआयजीएमएस पोर्टल, सीपीजीआरएएमएस, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (फेसबुक व ट्विटर) आणि २४ बाय ७ कॉल सेंटर यांचा त्यात समावेश आहे. श्रम मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, निर्वेध पुढाकाराअंतर्गत ईपीएफओने आता व्हॉट्सअॅप आधारित हेल्पलाइनवजा तक्रार निवारण व्यवस्था सुरू केली आहे. कोविड-१९ साथीच्या काळातही सदस्यांना निरंतर व विनाअडथळा सेवा मिळावी, यासाठी हा पुढाकार घेण्यात आला आहे. संपर्काचे माध्यम म्हणून व्हॉट्सअॅप भारतात प्रचंड लोकप्रिय झाले आहे. ही संधी साधून ईपीएफओने आपल्या हितधारकांशी थेट संपर्क साधता यावा यासाठी या प्लॅटफॉर्मचा आधार घेतला आहे. या सुविधेद्वारे ईपीएफओच्या विभागीय कार्यालयाशी थेट संपर्क करणे सदस्यांना शक्य होईल. ईपीएफओच्या सर्व १३८ विभागीय कार्यालयांत ही हेल्पलाइन सुरू राहील. प्रत्येक विभागीय कार्यालयाचा स्वतंत्र हेल्पलाइन क्रमांक असेल. त्यावर ईपीएफओ सदस्य व्हॉट्सअॅप मेसेजच्या माध्यमातून तक्रार करू शकतील.