भारतातील सर्वात नव्या फंड हाऊसेसपैकी एक असलेल्या झिरोदा असेट्स मॅनेजमेंट लिमिटेडनं (Zerodha Asset Management Ltd) बाजार नियामक सेबीकडून आपला अंतिम लायसन्स मिळवला होता. आता याच्या महिनाभरानंतर ते म्युच्युअल फंड स्कीम लाँच करण्याची तयारी करत आहेत. एका रिपोर्टनुसार त्यांनी झिरोदा टॅक्स सेव्हर (ELSS) निफ्टी लार्ज मिडकॅप २५० इंडेक्स आणि झिरोदा निफ्टी लार्ज मिडकॅप २५० इंडेक्स फंड (ZN250) लाँच करण्यासाठी बाजार नियामकाकडे ड्राफ्ट ऑफर डॉक्युमेंट फाईल केलं आहे.
झिरोदा टॅक्स सेव्हर निफ्टी लार्ज मिडकॅप २५० इंडेक्स फंड आणि झिरोदा निफ्टी लार्ज मिडकॅप २५० इंडेक्स फंडच्या लाँचसाठी कंपनीनं सेबीकडे कागदपत्रे जमा केली आहेत. या दोन्ही स्कीम्ससाठी बेंचमार्क निफ्टी लार्ज मिडकॅप २५० इंडेक्स फंड असेल. ईएलएसएस योजना ही एक टॅक्स सेव्हिंग स्कीम असेल जी १.५ लाखांच्या गुंतवणूकीपर्यंत ८० सी अंतर्गत टॅक्स कपातीचा लाभ देईल. सेबीच्या फायलिंगनुसार झिरोदा टॅक्स सेव्हर निफ्टी लार्जमिडकॅप २५० इंडेक्स फंड एक ओपन एंडेड पॅसिव्ह इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम आहे.
ETF करणार लाँच
आपल्या बिझनेस प्लॅननुसार झिरोदा पॅसिव्ह स्कीम्स लाँच करणार आहे. या क्षेत्रातील अधिकाऱ्यांनुसार, फंड हाऊन इंडेक्स फंडेसोबत एक्सचेंज ट्रेडेड फंडचे मिक्स लाँच करेल. झिरोला सप्टेंबर २०२१ मध्ये म्युच्युअल फंड व्यवसाय लाँच करण्यासाठी मंजुरी मिळाली होती.
झिरोदा फिनटेक कंपनी स्मॉलकेससोबत संयुक्त उपक्रम राबवणार असल्याचं काही महिन्यांपूर्वी झिरोदाचे फाऊंडर आणि सीईओ नितीन कामथ यांनी सांगितलं होतं. हा संयुक्त उपक्रम म्युच्युअल फंड्ससाठी असेट मॅनेजमेंट कंपनी स्थापन करेल.