नवी दिल्ली : राज्य कर्मचारी विमा महामंडळाने (ईएसआयसी) राष्ट्रीय आराेग्य प्राधिकरणासाेबत भागीदारी केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील ईएसआयसीच्या सभासदांना आता आयुष्यमान भारत पंतप्रधान जन आराेग्य याेजनेचा लाभ मिळणार आहे. या पथदर्शी भागीदारीची सुरुवात अहमदनगर जिल्ह्यापासून करण्यात आली हाेती. आता त्याची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. या याेजनेत दक्षिण मुंबई, पुणे आणि काेल्हापूर वगळता उर्वरित राज्याला समाविष्ट करण्यात आले आहे. सभासदांना अधिक चांगल्या आराेग्य सुविधांचा लाभ मिळण्यासाठी ईएसआयसीने हे पाऊल उचलले आहे. याची व्याप्ती वाढविण्यात आल्यामुळे पंतप्रधान जनआराेग्य याेजनेशी संलग्नित असलेल्या ८०७ रुग्णालयांमधील आराेग्य सेवेचा राज्यातील सभासदांना लाभ हाेणार आहे. या बदलामुळे आराेग्य सुविधा सभासदांच्या दाराशी उपलब्ध हाेतील. ईएसआयसीच्या महाराष्ट्राचे विभागीय संचालक प्रणय सिन्हा यांनी सांगितले, की ईएसआयसीच्या लाभार्थ्यांना घरापर्यंत आराेग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी दीर्घ कालावधीपासून आमचे प्रयत्न हाेते. राज्यातील सुमारे १.७७ काेटी ईएसआयसी लाभार्थ्यांना सुविधा मिळण्यासाठी चालना मिळेल.
राेजगार गेलेल्यांनाही मिळणार लाभ काेराेना काळात राेजगार गेल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना अटल बीमित व्यक्ती कल्याण याेजनेचा आता लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राेजगार गेल्यामुळे या कर्मचाऱ्यांचे ईएसआयसी याेजनेत शून्य याेगदान हाेते. अशा कर्मचाऱ्यांची पडताळणी करून विमा मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या याेजनेपासून खरे लाभार्थी वंचित राहणार नाहीत, असे महामंडळाने म्हटले आहे.