PMJAY Scheme : तुम्ही जर ईएसआयसी म्हणजेच कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे (ESIC) लाभार्थी असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. ईएसआयसीच्या वैद्यकीय लाभ परिषदेने (medical benefits council) लाभार्थ्यांसाठी आरोग्य सेवा वाढवण्यासाठी कर्मचारी राज्य विमा योजना आणि आयुष्मान भारत पीएम-जन आरोग्य योजना एकत्र आणण्यास मंजुरी दिली आहे. या दोन्ही योजना एकत्रित करण्याचा निर्णय कर्मचारी राज्य विमा महामंडळ मुख्य कार्यालयात झालेल्या वैद्यकीय लाभ परिषदेच्या ८६ व्या बैठकीत घेण्यात आला.
ईएसआयसीचे महासंचालक (डीजी) अशोक कुमार सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. आयुष्मान भारत आयुष्मान भारत पीएम-जन आरोग्य योजना ही जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना आहे. १२ कोटींहून अधिक गरीब कुटुंबांना (जवळपास ५५ कोटी लाभार्थी) वार्षिक ५ लाख रुपयांचा आरोग्य विमा प्रदान करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. परिषदेने राज्यांसाठी कॉमन सपोर्ट मिशन (CSM) लागू करण्यास मान्यता दिली. सीएसएमचे उद्दिष्ट विमाधारक व्यक्ती केंद्रित दृष्टिकोनावर लक्ष केंद्रित करून राज्यांमध्ये ईएसआयची वैद्यकीय सेवा वितरण प्रणाली सुधारणे आणि मजबूत करणे आहे.
जनजागृती शिबिर सुरू करण्यास मंजुरी
याचबरोबर, परिषदेने लाभार्थ्यांसाठी वार्षिक प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी आणि जागरुकता शिबिरे सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. ज्यामध्ये लाइफस्टाइल विकारांचे निदान करणे आणि विमाधारक व्यक्ती/महिला/ट्रान्सजेंडर्समधील पौष्टिक कमतरता शोधणे, यावर लक्ष केंद्रित केले आहे. अलीकडेच पीएम-जन आरोग्य योजनेंतर्गत, सरकारने ७० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना विमा संरक्षण देण्याची घोषणा केली आहे. आकडेवारीनुसार, १२,६९६ खाजगी रुग्णालयांसह एकूण २९,६४८ रुग्णालये आयुष्मान योजनेअंतर्गत सूचीबद्ध आहेत. ही योजना सध्या ३३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लागू आहे.
आयुष्मान भारत योजना काय आहे?
आयुष्मान भारत योजना किंवा PMJAY ही देशातील सर्वात मोठी आरोग्य योजना आहे. गरीब कुटुंबांना चांगले आरोग्य प्रदान करणे, हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबे आजारी पडल्यास त्यांना उपचारासाठी पैसे द्यावे लागत नाहीत. म्हणजेच, जर तुम्ही या योजनेत समाविष्ट असाल आणि आजारी पडलात, तर तुम्हाला रुग्णालयात दाखल करण्यासाठी, औषधे खरेदी करण्यासाठी खिशातून पैसे द्यावे लागणार नाहीत. कुटुंब कितीही मोठे असो किंवा लहान असो प्रत्येक कुटुंबाला या योजनेचा लाभ घेता येतो. याशिवाय तुम्ही कोणत्याही सरकारी किंवा खाजगी रुग्णालयात उपचार घेऊ शकता.