मुंबई : बंद पडलेली जेट एअरवेज खरेदी करण्यासाठी ‘एतिहाद एअरवेज पीजेएससी’ने आयबीसी प्रक्रियेच्या माध्यमातून नव्याने वाटाघाटी सुरू केल्या असल्याचे वृत्त आहे. एतिहाद ही अबुधाबीची राष्ट्रीय एअरलाईन आहे. माहीतगार सूत्रांनी सांगितले की, जेटचे अधिग्रहण करण्यास एतिहाद सदैव तयार होती. तथापि, आपल्याला अनुकूल असा सौदा व्हावा, यासाठी कंपनी वाट पाहत होती. जेट एअरवेजमध्ये एतिहादची आधीच २४ टक्के भागीदारी आहे.
हिंदुजा समूहाच्या बरोबरीने बोली लावण्याची तयारी आता कंपनीने सुरू केली आहे. दोन्ही कंपन्यांकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही. सूत्रांनी सांगितले की, दोन्ही पक्षांत वाटाघाटी सुरू आहेत. हिंदुजा समूह वित्तीय गुंतवणूकदार म्हणून समोर येणार असल्याचे समजते.
स्वतंत्र समभाग विश्लेषक अंबरीश बलिगा यांनी सांगितले की, लोकांना अजूनही जेट एअरवेजमध्ये रस आहे. कारण कंपनी अजूनही ‘ब्रँड इक्विटी’ आहे. छोट्या समभागधारकांना यातून काहीच मिळणार नाही. रणनीतिक गुंतवणूकदारांसाठी कंपनी निरुपयोगी आहे. कारण कंपनीचे शुद्ध मूल्य (नेट वर्थ) नकारात्मक झाले आहे. घसरण इतकी मोठी आहे की, किरकोळ गुंतवणूकदार सूक्ष्म अल्पसंख्याकांत परिवर्तित होतील. त्यांच्यासाठी आता काहीही उरलेले नाही.
बोलीसाठी ३ ऑगस्टची डेडलाईनसूत्रांनी सांगितले की, जेट एअरलाईनकरिता बोली लावण्यासाठी एतिहादने नॅशनल इन्व्हेस्टमेंट अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर फंड (एनआयआयएफ) या संस्थेला सोबत घेतले आहे. ही संस्था भारत सरकार आणि अबूधाबी गुंतवणूक प्राधिकरण यांचा संयुक्त उपक्रम आहे. जेट एअरवेजसाठी बोली सादर करण्याची अंतिम तारीख ३ आॅगस्ट २०१९ आहे. १४ आॅगस्ट २०१९ रोजी बोलींची छाननी होईल.