जर तुम्ही पेट्रोल पंप (Petol Pump) सुरू करण्याच्या विचारात असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. पेट्रोल पंप सुरू करण्याच्या नियमांमध्ये मोदी सरकारनं थोडी शिथिलता आणली आहे. पेट्रोल पंप सुरू करून तुम्ही महिन्याला लाखो रूपये कमवू शकता. मोदी सरकारनं पेट्रोल पंप मालकांसाठी पेट्रोल आणि डिझेलची (Petrol and Diesel) विक्री सुरू करण्यापूर्वी ईवी चार्जिंग स्टेशन (EV Charging Station) आणि सीएनजी (CNG) आऊटलेट सुरू करण्याची परवानगी दिली आहे.
नव्या संस्थांद्वारे पेट्रोल पंप सुरू करण्याच्या नियमांमध्ये शिथिलता आणली आहे, असं ८ नोव्हेंबर २०१९ च्या आदेशाबाबत पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं म्हटलं आहे. या आदेशात पेट्रोल पंपांसाठी नवे पर्याय CNG, LNG अथवा पेट्रोल, डिझेलच्या रिटेल सेलसोबत इलेक्ट्रिक वाहनांचे चार्जिंग पॉईंट्सही लावू शकणार आहेत. याचाच अर्थ एकाच पेट्रोल पंपावर पेट्रोल, डिझेल, CNG सोबत इलेक्ट्रीक वाहनांचे चार्जिंग स्टेशनही उभारता येतील.
इलेक्ट्रीक वाहनांसाठी चार्जिंग सुविधा
मंत्रायानं ५ ऑक्टोबर रोजी दिलेल्या नोटीसमध्ये एका अधिकृत युनिटला पेट्रोल आणि डिझेलसाठी आपलं रिटेल आऊटलेट उभारण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. पेट्रोल पंप युनिटमध्ये कमीतकमी एक नवं पर्यायी इंधन जसं की CNG, LNG सोबत इलेक्ट्रीक वाहनांच्या चार्जिंगचीही सुविधा द्यावी लागेल. नव्या नियमांनुसार २५० कोटी रूपयांची संपत्ती असलेल्या कंपनीला पेट्रोल डिझेलच्या किरकोळ विक्रीसाठी अर्ज करण्याची मुभा आहे. नोव्हेंबर २०१९ च्या धोरणांअंतर्गत आतापर्यंत, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, आयएमसी लिमिटेड, ऑनसाईट एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड, आसाम गॅस कंपनी, एम के अॅग्रोटेक, आरबीएमएल सोल्यूशन्स लिमिटेड आणि मानस अॅग्रो इंडस्ट्रीज अँड इन्फ्रास्ट्रक्चरला पेट्रोल पंप उभारण्याची परवानगी देण्यात आली आहे.
काय आवश्यक?
पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी भारतीय नागरिक असण्यासोबतच त्या व्यक्तीचं वय २१ ते ६० वर्षांपर्यंत असणं आवश्यक आहे. तसंच किमान शिक्षणाची अट ही दहावी ठेवण्यात आलं आहे. वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर अटी शर्थी पूर्ण करत पेट्रोल पंपाच्या डिलरशीपसाठी अर्ज करता येतो. जर तुम्हाला पेट्रोल पंप राष्ट्रीय किंवा राज्य महामार्गावर सरु करायचा असेल तर त्यासाठी १२०० ते १४०० चौरस मीटर जमिन असणं आवश्यक आहे. तर शहरी भागात ही अट ८०० चौरस मीटर इतकी आहे. कुटुंबातील सदस्यांच्या नावावर जमीन असली तरी तुम्ही पेट्रोल पंपासाठी अर्ज करू शकता.
तसंच आता नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार अर्जदाराकडे निधी आवश्यक असल्याची अट संपुष्टात आली आहे. तसंच मालकीबाबतच्या नियमांमध्येही सूट देण्यात आली आहे. यापूर्वी शहरी भागात आणि ग्रामीण भागात पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी अनुक्रमे २५ लाख आणि १२ लाखांची बँक ठेव दाखवणं अनिवार्य होतं.