Sahara Group SEBI News : सहारा समूहाचे संस्थापक सुब्रतो रॉय यांच्या निधनानंतरही सेबी या समूहाविरुद्ध खटला सुरूच ठेवणार आहे. सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांनी एका कार्यक्रमात यासंदर्भातील माहिती दिली. एखादी व्यक्ती हयात आहे अथवा नाही, सेबीसाठी ही बाब एका युनिटच्या व्यवस्थापनाशी संबंधित आहे आणि ती सुरूच राहील, असं माधवी पुरी बुच म्हणाल्या. सुब्रतो रॉय यांचं मंगळवारी वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झालं.
मिळणारा रिफंड खूपच कमी असल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना माधवी पुरी यांनी गुंतवणूकदारांनी केलेल्या दाव्यांच्या पुराव्याच्या आधारे सर्वोच्च न्यायालयानं नियुक्त केलेल्या समितीमार्फत पैसे परत करण्यात आले असल्याचं म्हटलं. गुंतवणूकदारांना केवळ १३८ कोटी रुपये परत केले गेले आहेत, तर सहारा समूहाला गुंतवणूकदारांना रिफंड देण्यासाठी सेबीकडे २४ हजार कोटी रुपये जमा करण्यास सांगितलं होतं. २०११ मध्ये सेबीने सहारा समूहाच्या दोन कंपन्यांना सहारा इंडिया रिअल इस्टेट कॉर्पोरेशन लिमिटेड (SIREL) आणि सहारा हाउसिंग इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (SHICL) यांना सुमारे तीन कोटी गुंतवणूकदारांकडून जमा केलेले पैसे परत करण्याचे आदेश दिले होते. दोन्ही कंपन्यांनी नियमांचे उल्लंघन करून निधी उभारल्याचं नियामकानं आदेशात म्हटलं होतं.
सेबीचे निर्देश कायम
प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर, सर्वोच्च न्यायालयानं ३१ ऑगस्ट २०१२ रोजी सेबीचे निर्देश कायम ठेवले आणि दोन्ही कंपन्यांना गुंतवणूकदारांकडून जमा केलेले पैसे १५ टक्के व्याजासह परत करण्यास सांगितलं. यानंतर सहाराला गुंतवणूकदारांना पैसे परत करण्यासाठी सेबीकडे अंदाजे २४ हजार कोटी रुपये जमा करण्यास सांगण्यात आलं. परंतु ९५ टक्क्यांपेक्षा अधिक गुंतवणूकदारांना थेट पैसे परत केल्याचं सहारा समूहानं सातत्यानं सांगितलं.
रिपोर्टनुसार, सेबीनं ११ वर्षांत सहारा समूहाच्या दोन कंपन्यांच्या गुंतवणूकदारांना १३८.०७ कोटी रुपये परत केले. दरम्यान, विशेष उघडलेल्या बँक खात्यांमध्ये जमा केलेली रक्कम पुन्हा २५ हजार कोटींहून अधिक झाली आहे. सहाराच्या दोन्ही कंपन्यांच्या बहुतांश बाँडधारकांनी याबाबत कोणताही दावा केलेला नाही.