Join us

निकालाआधीच बाजारात आतषबाजीसेन्सेक्सचा ऐतिहासिक उच्चांक, संपत्तीत १२ लाख कोटींची भर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2024 9:08 AM

सर्वाधिक उंची गाठल्यानंतर सेन्सेक्स २,५०७ अंकांच्या वृद्धीनंतर ७६,४६८ अंकांवर स्थिरावला तर निफ्टी ७३३ अंकांच्या वाढीनंतर २३,२६३ अंकांवर बंद झाला. 

मुंबई : लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर होणार आहे. परंतु, याआधी एक दिवस शेअर बाजाराने २७७७ अंकांची विक्रमी उसळी घेत आजवरची ७६,७३८ अंकांची ऐतिहासिक उंची गाठली आहे. निफ्टीही ८०८ अंकांनी वधारून सार्वकालिक २३,३३८ अंकांच्या उंचीवर पोहोचला. बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदारांनी निकालाआधीच फटाके फोडले. कारण त्यांच्या संपत्तीत तब्बल १२ लाख कोटींची भर पडली आहे. सर्वाधिक उंची गाठल्यानंतर सेन्सेक्स २,५०७ अंकांच्या वृद्धीनंतर ७६,४६८ अंकांवर स्थिरावला तर निफ्टी ७३३ अंकांच्या वाढीनंतर २३,२६३ अंकांवर बंद झाला. सेन्सेक्समधील ३० पैकी २५ शेअर्समध्ये वाढ तर उर्वरित ५ मध्ये घट झाली. अदानी पोर्ट्स, एसबीआय व एनटीपीसीचे शेअर्स वाढले तर आयशर मोटर्स, एलटीआय माईंडट्री, एचसीएल टेक यांचे शेअर्स घसरले.

विकास दरामुळे मिळाले बळगेल्या आर्थिक वर्षातील मजबूत विकास दराचाही शेअर बाजाराला चांगला फायदा झाल्याचे दिसून आले आहे. मार्चमध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था ८.२ टक्के  दराने वाढली होती. शुक्रवारीच हे आकडे समोर आले आहेत. ज्यामुळे जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून देशाची स्थिती मजबूत झाली होती. यामुळे बाजाराच्या वाढीला चांगलेच बळ मिळाल्याचे दिसून आले. 

पंतप्रधानांचे भाकीत खरे ठरलेपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत मतमोजणी दिवशी बाजारात तेजी येईल, असे भाकीत केले होते. हे एक दिवस आधीच खरे ठरले आहे. पंतप्रधान म्हणाले होते की, निवडणूक निकाल ४ जून रोजी समोर येताच बाजार आधीचे सर्व विक्रम मोडणार आहे.

अदानी ग्रुपचे सर्व शेअर्स वधारलेसोमवारी अदानी ग्रुपच्या सर्व १० शेअर्समध्ये तेजी दिसून आली. अदानी पाॅवर्सचे शेअर्स सर्वाधिक १६ टक्के वाढले. शुक्रवारीही अदानी ग्रुपच्या सर्व शेअर्समध्ये वाढ झाली होती. सोमवारीही अदानी ग्रुपच्या १० कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार वृद्धी झाल्याने अदानी ग्रुपचे एकूण बाजार भांडवल २० लाख कोटींहून अधिक झाले आहे. शुक्रवारी अदानी ग्रुपच्या कंपन्यांचे बाजार भांडवल १८ लाख कोटी इतके होते. 

शेअर्स विकता येत नसल्याच्या तक्रारीबाजारात जोरदार तेजीचे वातावरण असताना काही गुंतवणूकदारांनी शेअर्सची विक्री करता येत नसल्याच्या तक्रारी केल्या. झेरोधा, ग्रो आणि अपस्टॉक या प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागला.गुंतवणूकदरांना शेअर्सची विक्री करताना टीपिन व्हेरिफिकेशनमध्ये अडचणी येत होत्या. सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेडच्या (सीडीएसएल) वेबसाइटमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी आल्या. 

टॅग्स :लोकसभा निवडणूक २०२४शेअर बाजार