Join us

भाजप सरकारच्या काळामध्येही मी २६ महिने आरबीआय गव्हर्नर होतो - डॉ. रघुराम राजन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2019 3:18 AM

सरकारी बँंकांची स्थिती बिघडल्याच्या निर्मला सीतारामन यांच्या आरोपाचे केले खंडन

नवी दिल्ली : केंद्रात डॉ. मनमोहन सिंग यांचे सरकार असताना मी केवळ ८ महिनेच रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर होतो आणि भाजपच्या काळात मी २६ महिने गव्हर्नर म्हणून काम केले, असे सांगून डॉ. रघुराम राजन यांनी माझ्या काळात सरकारी बँकांची स्थिती बिघडली, या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या आरोपाचे खंडन केले आहे.

एका मुलाखतीत डॉ. रघुराम म्हणाले की, मी रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर असतानाच बँकांना बुडित कर्जाच्या गाळातून बाहेर काढण्याचे काम सुरू केले होते आणि त्या पदी असेपर्यंत मी ते केले होते. त्यामुळे माझ्या काळात सरकारी बँकांची स्थिती बिघडली, हा आरोप पूर्णत: चुकीचा आहे. न्यूयॉर्कमधील एका कार्यक्रमात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी डॉ. रघुराम राजन व माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळातच बँका अडचणीत आल्याचे म्हटले होते.

डॉ. राजन म्हणाले की, आर्थिक विकासासाठी सरकार खरोखर प्रयत्नशील असेल तर आता नव्या स्वरुपाच्या आर्थिक सुधारणा करणेही आवश्यक आहेत. केवळ पाच टक्के वृद्धी दर असेल तर लोकांना रोजगार मिळणे अवघडच नव्हे, तर अशक्य आहे. भारतात दरमहा १0 लाख लोक नोकऱ्यांचा शोध सुरू करतात. त्यामुळे आर्थिक विकासाचा दर वाढवण्यास प्राधान्य देणे गरजेचे आहे. आर्थिक सुधारणा करण्यासाठी सत्ताधारी पक्षाकडे राजकीय बळ आहे, ही चांगली गोष्ट आहे. पण त्यादृष्टीने पावले पडताना दिसत नाही, ही बाब दुर्दैवाची आहे.

बँकिंग क्षेत्र पूर्णपणे स्वच्छ करणे गरजेचे आहे आणि तेव्हा आपण त्यासाठी जे प्रयत्न सुरू केले होते, ते आजही कायम आहेत. पण बँकिंग क्षेत्रात व नॉन बँकिंग फायनान्शियल सेक्टरमध्ये पुनर्भांडवलाची गरज आहे. अन्यथा आता सुरू असलेले प्रयत्न अर्धवट ठरतील, असेही ते म्हणाले.राजकीय प्रश्न नकोतडॉ. राजन यांच्या काळात राजकीय नेत्यांच्या एका फोनवर काहींना कर्जे देण्यात आली होती. त्यामुळेच बँका आर्थिक अडचणीत आल्या, या निर्मला सीतारामन यांच्या आरोपाविषयी विचारता ते म्हणाले की, मी कोणत्याही राजकीय स्वरूपाच्या विषयावर बोलू इच्छित नाही. त्यावेळी राजन यांनी अन्य राजकीय प्रश्नांवरही भाष्य करण्याचे टाळले.

टॅग्स :रघुराम राजनबँकभारतीय रिझर्व्ह बँक