मुंबई : सरकारी बँकांच्या दोन दिवसीय संपामुळे रखडलेले धनादेश आता आणखी तीन दिवस अडकून पडणार आहेत. बँक कर्मचाऱ्यांचा दोन दिवसांचा संप गुरूवारी संपला. परंतु राज्यातील सुमारे सव्वालाख कोटींच्या धनादेशांना याचाफटका बसला. देशभरात २१ लाख कोटी रुपयांचे ४० लाख धनादेश संपामुळे अडकून पडले.बँक व्यवस्थापनाच्या २ टक्के पगारवाढीच्या निषेधार्थ बँक कर्मचाºयांच्या नऊ युनियनने बुधवार व गुरूवारी संप पुकारला होता. राज्यभरातील १२००० शाखांमधील ३६००० कर्मचारी व ८००० अधिकारी या संपात सहभागी झाले.धनादेश क्लिअरिंग हाऊसमधील कर्मचारीही संपात असल्याने रखडलेले धनादेश पुढील आणखी तीन दिवस वटण्याची शक्यता कमी आहे. संपामुळे ३१ तारखेला होणारे अनेक कर्मचाºयांचे व पेन्शनर्सचे वेतन झाले नाही. १ जूनला बँका सुरु होताच या वेतनाशी संबंधित कामे आटपावी लागतील. शनिवारी बँकाचे कामकाज नियमित असले तरी त्या दिवशी क्लिअरिंग हाऊस धनादेशाचे काम केले जात नाही.सरकारी बँकांच्या व्यवस्थापनाने २ टक्के वेतनवाढ देऊ केली आहे. पण याआधी २०१२ साली १५ टक्के वेतनवाढ दिली होती. महागाई ५ टक्क्यांनी वाढ असल्याने पुरेशी वेतनवाढ द्यावी, अशी मागणी नऊ युनियन्सच्या ‘यूएफबीयू’ या संयुक्त फोरमने केली होती. त्यासाठी संप पुकारला होता. पुढील आंदोलनाची दिशा लवकरच निश्चित केली जाईल, असे यूएफबीयूचे संयोजक देविदास तुळजापुरकर यांनी सांगितले.
संप मिटला तरीही धनादेश रखडणारच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2018 6:36 AM