Join us

महागाई कमी झाली तरी वस्तूंचे दर चढेच!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 11:20 AM

एकूण महागाई घटली असली तरी खाद्य वस्तूंचे दर मात्र चढेच आहेत. 

नवी दिल्ली : घाऊक क्षेत्रातील महागाईचा दर जूनमध्ये किंचित घसरून १५.१८ टक्क्यांवर आला आहे. मे महिन्यात तो १५.८८ टक्के होता. एकूण महागाई घटली असली तरी खाद्य वस्तूंचे दर मात्र चढेच आहेत. 

घाऊक मूल्य निर्देशांकावर आधारित महागाईचा दर सलग १५ व्या महिन्यात दाेन अंकी राहिला आहे. एप्रिलमध्ये तो १५.०८ टक्के, मार्चमध्ये १४.५५ टक्के आणि फेब्रुवारीत १३.११ टक्के होता. इंधन आणि ऊर्जा क्षेत्रात दर कपात झाल्यामुळे महागाईचा पारा उतरला आहे. मात्र, खाद्य वस्तूंच्या महागाईचा दर वर चढल्याचे दिसून आले आहे.

ही तर चिंताजनक बाबजाणकारांनी सांगितले की, घाऊक क्षेत्रातील महागाईचा दर दीर्घकाळ उच्च पातळीवर राहणे हे चिंताजनक आहे. उत्पादन क्षेत्रावर त्याचा प्रतिकूल परिणाम होतो. उत्पादक ही महागाई दीर्घकाळ सहन करू शकत नाहीत. अंतिमत: तिचा बोजा ते ग्राहकांवरच टाकतात.

काय झाले महाग?

  • मेमध्ये १०.८९ टक्के असलेली खाद्य वस्तूंची महागाई जूनमध्ये वाढून १२.४१ टक्के झाली. 
  • भाज्यांची महागाई ५६.३६ टक्क्यांवरून ५६.७५% झाली. 
  • बटाट्यांचा दर २४.८३ टक्क्यांवरून ३९.३८% झाला. 
  • अंडी, मांस आणि मासळी यांचा महागाई दर मात्र ७.७८%वरून घटून ७.२४% झाला. 
  • कांद्यांचा महागाई दर २०.४० टक्क्यांवरून घटून -३१.५४ टक्क्यांवर आला. 

अमेरिकेतील महागाई ४१ वर्षांच्या उच्चांकावर

  • अमेरिकेतील महागाई वाढून ४१ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. जूनमध्ये येथील महागाई १९८१ नंतरच्या सर्वाधिक गतीने वाढली आहे. गॅसपासून किराणा सामानापर्यंत सर्व वस्तूंचे भाव वाढले आहेत. 
  • ब्यूरो ऑफ लेबर स्टॅटिस्टिक्सच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेतील ग्राहक मूल्य निर्देशांक (सीपीआय) जूनमध्ये आदल्या वर्षाच्या तुलनेत ९.१ टक्क्यांनी वाढला. 
  • मेमध्ये त्याची गती ८.६% होती. मासिक आधारावर तो १.३ टक्क्याने वाढला आहे. फेडरल रिझर्व्हच्या २ टक्क्यांच्या लक्ष्यापेक्षा महागाईचा प्रत्यक्षातील दर ५ पट अधिक आहे.

 

टॅग्स :महागाईभारत