नवी दिल्ली : भारतात वेगाने वाढत असलेला मध्यमवर्ग, लोकांच्या खरेदीच्या बदलत असलेल्या संकल्पना, बाजारात अनेक प्रकारच्याकारचे उपलब्ध असलेले पर्याय आणि परवडणाऱ्या किमतीत कार खरेदीचा वाढता कल, यामुळे देशात सध्या सेंकड हँड कार्सना मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. येत्या १० वर्षांत जुन्या गाड्यांची उलाढाल १०० अब्ज डॉलर्सच्या घरात जाईल, असा अंदाज कार्स २४ कंपनीचे सहसंस्थापक आणि सीईओ विक्रम चोपडा यांनी वर्तविला आहे.
विक्रम चोपडा म्हणाले की, आम्ही केलेल्या सर्वेक्षणानुसार भारतात जुन्या कारचा बाजार वार्षिक १५ टक्के दराने वाढत आहे. २०२३ साली २५ अब्ज डॉलर्सच्या असलेल्या या बाजारातील उलाढाल २०३४ पर्यंत १०० अब्ज डॉलर्सपर्यंत वाढू शकते.
जुन्या ईव्हीची पडणार भर : परवडणाऱ्या किमतीत चारचाकी घेण्यास लोक प्राधान्य देत आहेत. मागणी वाढल्याने येत्या ५ वर्षांत सेकंड हँड इलेक्ट्रिक कारही बाजारात विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील.
८% इतक्या लोकांकडेच भारतात स्वत:च्या मालकीच्या गाड्या आहेत. भविष्यात हे प्रमाण आणखी वाढू शकते.
८०% लोकसंख्येकडे अमेरिका, चीनसह युरोपात मालकीच्या कार आहेत.
४-५ वर्षांत बदलतात कार
दोन दशकांपूर्वी नागरिक एक कार साधारणपणे १० ते १२ वर्षे वापरत असत; परंतु सध्या हा ट्रेंड बदलला आहे. सध्या तरुणपिढी केवळ ४ ते ५ वर्षांत कार बदलण्यास प्राधान्य देत आहे. त्यामुळे परवडणाऱ्या किमतीतील जुन्या गाड्यांना मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.