नवी दिल्ली - इलेक्ट्रिक वाहनांवर सरकारकडून देण्यात येत असलेल्या सबसिडीमध्ये कपात केली असली, तरीही २०२४ या आर्थिक वर्षात या वाहनांची विक्री जोरदार वाढली आहे. ताज्या आकडेवारीनुसार, भारतीय इलेक्ट्रिक वाहन उद्योगाने आर्थिक वर्ष २०२४ मध्ये विविध प्रकारच्या वाहनांची रेकॉर्डब्रेक विक्री केली आहे. एकट्या मार्चमध्ये १ लाख ९७ हजारहून अधिक इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीचा नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. सरकारच्या वाहन वेबसाइटवरील डेटा दर्शवितो की, एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ पर्यंत भारतात १६,६५,२७० ईव्हींची खरेदी करण्यात आली.
मागील वर्षात देशभरात ११ लाख ईव्हींची नोंद झाली होती. या वाहनांच्या विक्रीचे प्रमाणही वर्षभरात ५.३ टक्क्यांवरून वाढून ६.८ टक्के इतके झाले आहे. जाणकारांच्या मते सरकारच्या फेम-टू सबसिडी योजनेमुळे ग्राहक मोठ्या प्रमाणात याकडे आकर्षित झाले आहेत.
४,५६२ इतकी सरासरी ईव्ही वाहने २०२४ या वर्षात दररोज विकली गेली. ३,२४२ इतक्या सरासरी ईव्हींची नोंद दररोज २०२३ मध्ये झाली.
कशामुळे वाढली विक्री? - जुलै अखेरपर्यंत इ वाहन खरेदीला प्रोत्साहन चालू ठेवण्यासाठी सरकारने ५०० कोटींची इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रमोशन स्कीम सुरू केली. - पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या सातत्याने वाढणाऱ्या किमतींमुळेही ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांकडे वळू लागले आहेत, असे जाणकार सांगतात. - भारत सरकारने एक नवीन इलेक्ट्रिक वाहन उपक्रम मंजूर केला आहे. ज्यामध्ये कर सवलतींचाही समावेश आहे.
बाइक विक्रीही जोरात सर्व ईव्ही विक्रीत दुचाकी वाहनांचा वाटा ५६ टक्के आहे. यात २९ टक्के वाढ झाली आहे. तीनचाकी वाहनांचा वाटा ३८ टक्के असून विक्रीचे प्रमाण ५७ टक्क्यांनी वाढले आहे.