केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने आपल्या पहिल्या कार्यकाळात अनेक योजना सुरू केल्या होत्या. यातील एक मोठी योजना म्हणजे पंतप्रधान जनधन योजना. देशातील प्रत्येक गरीब व्यक्तीला बँकिंग प्रणालीशी जोडणे हा या योजनेमागचा उद्देश होता. आता या खात्यावर केंद्रातील मोदी सरकार पीएम किसान योजनेसारख्या सरकारी योजनांचे पैसे तर पाठवतेच, शिवाय, ग्राहकांना अनेक विशेष सुविधाही मिळतात. अशीच एक सुविधा आहे ओव्हरड्राफ्टची. या सुवेधेंतर्गत ग्राहकांना बँक खात्यात पैसे नसतानाही अर्थात शून्य बॅलेन्स असतानाही पैसे काढण्याची सुविधा मिळते.
किती आहे मर्यादा -ओव्हरड्राफ्टची मर्यादा 10 हजार रुपयांची आहे. तर विना अट 2,000 रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळते. यासाठीची कमाल वयोमर्यादा 60 वरून 65 वर्षे करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे, यापूर्वी ओव्हरड्राफ्टची मर्यादा 5,000 रुपये एवढी होती. ही मर्यादा आता 10,000 रुपयांवर पोहोचली आहे.
51 कोटीहून अधिक खातेदार - केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉ. भागवत किसनराव कराड यांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 नोव्हेंबर 2023 पर्यंत एकूण 51.04 कोटी प्रधानमंत्री जन धन योजना (पीएमजेडीवाय) खाती उघडण्यात आली आहेत. यात 2,08,855 कोटी रुपये एवढे पैसे आहेत. 22 नोव्हेंबरपर्यंत एकूण 4.30 कोटी पीएमजेडीवाय खात्यांमध्ये शून्य बॅलेन्स होते.
सरकारी आकडेवारीनुसार, जनधन खात्यांपैकी जवळपास 55.5 टक्के खाती ही महिलांची आहेत आणि 67 टक्के खाती ही ग्रामीण/अर्ध-शहरी भागात उघडण्यात आली आहेत. याशिवाय, या खात्यांसाठी जवळपास 34 कोटी ‘रुपे कार्ड’ कुठल्याही शुल्काशिवाय जारी करण्यात आले आहेत. याअंतर्गत 2 लाख रुपयांचे अपघात विमा संरक्षण देखील प्रदान केले जाते.